आम्हीच रात्रभर का जागायचे? शेतकऱ्यांचा महावितरणला सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer

आम्हीच रात्रभर का जागायचे? शेतकऱ्यांचा महावितरणला सवाल

मालेगाव कॅम्प (जि. नाशिक) : ऐन थंडीच्या दिवसात दिवसभर वीज गायब आणि रात्री शेतीसाठी वीज उपलब्ध या प्रकाराने शेतकरी हैराण झाले आहेत. वीजेच्या हक्काच्या ग्राहकाला फक्त रात्रीचा वीजपुरवठा करुन महावितरण शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे. दिवसरात्र काम करावे लागत असल्याने शेतकऱ्यांच्याच पदरी हा अन्याय का, असा त्रस्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला होत आहे. वीजपुरवठ्याची वेळ शासनाने बदलून द्यावी, अशी मागणी चंदनपुरी येथील बाबाजी शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रकाद्वारे केली आहे.

बळीराजाचा जीवघेणा संघर्ष

जिल्ह्यात शेतकऱ्यांना शेतीची विविध कामे दिवसभर करावी लागतात. कापणी, मळणी, कोळपणी, काढणी, साठवणूक, विक्री, मजूर व्यवस्थापन अशी कामे करावी लागतात. या कामांसाठी दिवस अपुरा पडत असताना शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांना शेतीकामासाठी जुंपवावे लागते. अशावेळी महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना रात्रीचा वीजपुरवठा करुन जीवघेणा संघर्ष करण्याची वेळ आणली आहे. साप, विंचू यांच्या सोबतीने शेतकरी व मजुरांना शेतीला पाणीपुरवठा करावा लागतो. परिसरात सर्वत्र बिबट्याचा संचार असल्याने हा संघर्ष अतितीव्र बनला आहे.

हेही वाचा: अंबासन फाट्यावर अवैध गोवंश वाहतूक करणारा पिकअप पोलीसांच्या ताब्यात

सरकार, वीजमंडळाला कणव येत नाही का?

अंधारात वीजेची उपकरणे दुरुस्त करावी लागतात. महावितरण कंपनीचे जनरेटर व तत्सम साधने बिघडल्यास शेतकऱ्यांनाच ही दुरुस्ती अंधारात करावी लागते. शेती उद्योगालाच रात्रीचा वीजपुरवठा देण्यामागील वीजमंडळाचे नेमके धोरण काय, शेतकरी रोज मृत्युशी लढत असताना राज्य सरकार आणि वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना कणव येत नाही का, असा उदविग्न सवाल चंदनपुरी येथील शेतकऱ्यांनी केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादा भुसे, उर्जामंत्री नितीन राऊत यांना वीजपुरवठ्याच्या वेळेत बदल करण्यासाठी साकडे घातले आहे.

दिवसा किमान बारा तास वीज शेतीसाठी उपलब्ध करावी, अशी मागणी बाबाजी शेलार, श्रीमती शोभाबाई शेलार, उज्वलाबाई शेलार, बाबाजी सोनवणे, सुनील बागूल, राजेंद्र शेलार, बन्सीलाल आहिरे, मनोहर आहिरे, हरिलाल शेलार, शैलेंद्र दुबे यांनी केली आहे.

हेही वाचा: नाशिक : सांस्‍कृतिक राजकारणात ‘जयभीम’ मैलाचा दगड

''रात्रीचा वीजपुरवठा करुन महावितरण शेतकऱ्यांवर घोर अन्याय करत आहे. शेतकऱ्यांच्याच वाट्याला हा अन्याय का, दिवसा वीज मिळविण्यासाठी शेतकरी पात्र नाहीत का?'' - बाबाजी शेलार, शेतकरी, चंदनपुरी

loading image
go to top