शेतकऱ्यांनी वाचविले सोयाबीन बियाण्यांचे 900 कोटी! Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

soyabeans

शेतकऱ्यांनी वाचविले सोयाबीन बियाण्यांचे 900 कोटी!

नाशिक : खरीप हंगाम सुरू झाला, की सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीच्या तक्रारींचा पाऊस पडायचा. त्यावर उपाय म्हणून कृषी विभागाने बीजोत्पादनाचा कार्यक्रम राज्यातील शेतकऱ्यांकडून राबवून घेतला. त्याचा परिणाम असा झाला, की गेल्या वर्षीच्या खरिपामध्ये शेतकऱ्यांनी स्वतः बियाण्याचे उत्पादन केल्याने त्यांचे ९०० कोटी वाचले आहेत. एवढेच नव्हे, तर बियाण्याच्या उगवणीची एकही तक्रार कृषी विभागापर्यंत पोचली नाही.

एकही तक्रार कृषी विभागापर्यंत पोचली नाही.

राज्यात २०२१ च्या खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र ४६ लाख १७ हजार हेक्टरपर्यंत पोचले. एकूण खरीप क्षेत्राच्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र ३१.६ टक्के राहिले. २०२० च्या खरिपात सोयाबीनचे पुरेसे बियाणे शेतकऱ्यांकडे उपलब्ध नव्हते. परिणामी, बाजारातून बियाणे विकत घ्यावे लागले. मात्र, बाजारातून विकत घेतलेल्या बियाण्याची उगवण क्षमता नसल्याच्या एक लाख २० हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागापर्यंत पोचल्या होत्या. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसह बियाण्यापोटी कृषी विभागाला १५ ते १८ कोटी रुपये द्यावे लागले होते. ही समस्या दूर करण्यासाठी कृषी आयुक्तालयातर्फे शेतकऱ्यांकडून बीजोत्पादन करून घेण्यासाठी प्रत्येक आठवड्याला सोमवार आणि गुरुवार हा दिवस संवाद, मार्गदर्शनासाठी निश्‍चित केला होता. परिणामी, ३४ लाखांपैकी २४ लाख क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी उत्पादित केले. बियाण्याच्या उत्पादनाच्या जोडीला लागवडीत अंतर किती ठेवायचे, खत कसे द्यायचे, काढणी, साठवणुकीपासून उगवण क्षमता तपासणीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात आली. या सगळ्या प्रयत्नांमुळे हेक्टरी ८ ते १० क्विंटलवरून सरासरी उत्पादन १२ ते १४ क्विंटलपर्यंत पोचल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले. एवढेच नव्हे, तर सोयाबीनला मिळणाऱ्या भावामुळे पुढील खरीप हंगामात राज्यातील सोयाबीनखालील क्षेत्र ५० लाख हेक्टरपर्यंत पोचण्याची शक्यता कृषी विभागाला वाटत आहे.

पेरणीऐवजी टोचूनचे तंत्र पोचवणार

पश्‍चिम महाराष्ट्रात हेक्टरी सोयाबीनचे उत्पादन २५ क्विंटलपर्यंत घेतले जाते. मात्र, नांदेडच्या कृषी सहाय्यकाच्या प्रयत्नातून हेक्टरी ५० क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेतले गेले. त्यासाठी सरी-वरंब्याचा वापर करण्यात आला. उत्पादनवाढीचे हे तंत्र आता राज्यातील सर्वदूर शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागातर्फे पोचविण्यात येणार आहे. तिफण, ट्रॅक्टर, यंत्राच्या सहाय्याने सोयाबीन बियाण्याची पेरणी करण्याऐवजी सरी-वरंबा पद्धतीत बियाणे टोचून सरींमध्ये पाणी सोडण्याचे तंत्र शेतकऱ्यांना सांगितले जाणार असल्याची माहिती दक्षता विभागाचे कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी दिली. दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याच्या तुटवड्यावर स्वतः उपाय शोधला असला, तरीही शेजारच्या मध्य प्रदेशात बियाण्यांच्या उपलब्धतेअभावी सोयाबीनऐवजी इतर पिकांकडे शेतकऱ्यांनी जावे, असे सांगितले गेले होते.

हेही वाचा: कुलगाम चकमक : पाकिस्तानी दहशतवादी बाबर ठार, पोलीस कर्मचारी शहीद

हेक्टरी उत्पादन १० वरून १४ क्विंटल; ५० लाख हेक्टरपर्यंत क्षेत्र शक्य

कृषी विभागातर्फे सोयाबीन बियाण्यांचा प्रश्‍न मार्गी लावत असताना, कृषी निविष्ठांच्या परवान्यातील पारदर्शकता ऑनलाइनच्या माध्यमातून आणली आहे. यापुढील टप्प्यात कृषी विभागाचे निरीक्षक आणि प्रयोगशाळांचे कामकाज ऑनलाइन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.-दिलीप झेंडे, कृषी संचालक

हेही वाचा: PM मोदींच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार गैरहजर?

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikFarmer
loading image
go to top