
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
सटाणा (जि. नाशिक) : दहिंदुले (ता. बागलाण) येथील शिवारात बिबट्याने (Leopard) धुमाकूळ घातला असून, भरदुपारी एका शेतकऱ्यावर झडप घालून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. शेजारी शेतीची कामे करणाऱ्या मजुरांनी हल्लाबोल केल्याने पुढील अनर्थ टळला. वर्षभर बिबट्याचा मुक्तसंचार असूनही वन विभागाकडून कोणतीही संरक्षणात्मक उपाययोजना करण्यास असमर्थता दर्शविली जात असल्याने दहिंदुले, केळझर, चापापाडा, तिळवण, निकवेल, कंधाने, तिळवण, डांगसौंदाणे आणि परिसरात भितीचे वातावरण पसरले असून, वनविभागाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. (Farmers seriously injured in leopard attack Nashik News)
दहिंदुले येथील शेतकरी जिभाऊ वाळू गायकवाड (वय ६०) हे शुक्रवारी (ता. १) पेरणीपूर्व मशागतीची कामे करीत होते. शेताच्या एका बाजूस आंबे, करवंद, जांभूळची झाडे व काटेरी झुडपे आहेत. दुपारी बारा ते एकच्या दरम्यान नांगरत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने गायकवाड यांच्या अंगावर झडप घातली. पूर्ण ताकदीनिशी गायकवाड यांनी बिबट्यास दूर लोटले व बचावासाठी जोरात आरोळ्या मारल्या. गायकवाड यांच्या आवाजामुळे आजूबाजूचे शेतकरी धाऊन आले. त्यांना पाहून बिबट्याने दाट झाडांमध्ये धूम ठोकली. या झटापटीत गायकवाड यांच्या मान, कान व पोटावर खोल जखमा झाल्या आहेत. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना तातडीने सटाणा येथील सिम्स यशोधन रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. प्रकाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संदेश निकम, डॉ. डी. एम. सोनवणे, डॉ. मनोज बडगुजर, डॉ. तुषार वाघ त्यांच्यावर उपचार करीत आहेत.
हेही वाचा: सीपेट प्रकल्पाला भुजबळांकडून खोडा; खासदार हेमंत गोडसे यांचा आरोप
पिंजरे लावण्याची मागणी
गेल्या अनेक महिन्यांपासून दहिंदुले, केळझर, चापापाडा, तिळवण, निकवेल, कंधाने, तिळवण, डांगसौंदाणे आणि परिसरात बिबट्यांचा मुक्तसंचार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात काम करणे अवघड झाले आहे. आता भरदुपारी सुद्धा बिबट्याचा हल्ला होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी सातत्याने वन विभागाकडे पाठपुरावा करून पिंजरे लावावेत आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. मात्र, वन विभागाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे.
हेही वाचा: बंडखोरांना जिवंतपणी दाखवले अमरधाम
Web Title: Farmers Seriously Injured In Leopard Attack Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..