
शेतकऱ्याचे अनोखे ‘अश्वनृत्य’; आदिवासींची संस्कृती टिकविण्यासाठी धडपड
नाशिक : अतिदुर्गम भागातील शिंगाळीपाडा (ता. पेठ) घनदाट जंगलाने वेढलेला. इथल्या अनेक घरांवर वारली कला (Warli art) पाहावयास मिळते. विविध प्रकारचे रेखीव दरवाजे आकर्षित करतात. हा पाडा गुजरातच्या सीमेवर असून, इथले राम दराडे हे वनपट्ट्यावर पावसाळी शेती (Rainfed farming) करतात. पन्नाशीतील हा शेतकरी पावसाळ्यानंतर रोजंदारी करून प्रपंच चालवितात. त्यांची आदिवासींची संस्कृती (Tribal culture) टिकविण्याची धडपड चाललेली आहे. ते अप्रतिम असे ‘अश्वनृत्य’ (Horse Dance) करतात.
आदिवासी संस्कृतीचा अभिमान रामू यांच्यात गच्च आहे. आपली संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. लहानपणापासून काहीतरी वेगळे करावे, हे त्यांचे स्वप्न होते. लहानपणी एका लग्नात त्यांनी घोड्यावरून नाचण्याचा खेळ पाहिला होता. त्यातून हे नृत्य आपण करू शकतो, असा निर्धार करत घरी येऊन त्यांनी खेळासाठी लागणाऱ्या वस्तू टाकाऊतून घरीच बनविल्या. लाकडाचा घोडा बनविला. दोन फूट उंचीच्या खांबावर कशाचाही आधार न घेता नाचण्याचा सराव ते करू लागले. हे नृत्य करणे सोपे नव्हते. नृत्य करताना पाय घट्ट बांधावे लागतात. घट्ट बांधलेले पाय सोडले जातात, तेव्हा रक्त गोठलेले असते.
हेही वाचा: Malegaon : हनुमान चालिसा पठणासाठी तुर्तास कुणाचाही अर्ज नाही
नृत्यामुळे अनेकदा रामू यांच्या मांडीला मोठ्या जखमा झाल्या. पण जिद्द सोडली नाही. त्याला फळ मिळाले. आता त्यांचे नृत्य पाहण्यासाठी नाशिकमधून लोक येतात. ते गावात घोड्यावर नाचून दाखवितात. हा खेळ पटल्याने नाशिकमधून अश्वनृत्यासाठी त्यांना बोलविले जाते. आदिवासी भागात अनेक कलावंत आहेत. पण त्यांना व्यासपीठ मिळत नाही, अशी खंत रामू यांना वाटते.
हेही वाचा: नाशिक : नाशिकच्या धावपटूंनी पदकांची केली लयलूट
"गेल्या तीस वर्षांपासून मी अश्वनृत्य करतो. जनू वळवी यांची मोलाची साथ मिळते. शहरात जाऊन आम्ही आमची कला सादर करतो. पण मानधन अल्प मिळते. सरकारने आम्हा आदिवासी कलावंतांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबत कुटुंबाच्या उदरनिर्वाहापुरते मानधन द्यायला हवे."
- रामू दराडे, अश्वनृत्य कलावंत
Web Title: Farmers Unique Horse Dance Struggle To Preserve Tribal Culture Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..