
नाशिक : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजानच्या पार्श्वभूमीवर आठवड्याला नऊ हजार टन कांदा निर्यातीसाठी रवाना होतो. यंदा स्थिती नेमकी काय आहे, याची माहिती घेतल्यावर आयातदारांकडून 15 टक्के ऑर्डर मिळाल्याचे निर्यातदारांनी सांगितले आहे. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर "डिमांड ब्लॉक' असल्याचे पडसाद स्थानिक बाजारपेठेत उमटले असून, कांद्याच्या भावातील घसरण कायम आहे. उन्हाळ कांदा किलोला आठ रुपये भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
भावातील घसरण कायम; उन्हाळ कांद्याचा किलोचा भाव आठ रुपये
लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर "पॅनिक सेलिंग'मध्ये 12 ते 15 रुपये किलो भावाने कांद्याची विक्री झाली होती. मात्र पुढे बंदरातून जहाजांची वाहतूक मंदावत असताना वातानुकूलित कंटेनरपासून ते ट्रक उपलब्ध होण्याचे प्रश्न तयार झाले. त्यातून कांद्याच्या भावात सुरू झालेली घसरण थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. मध्यंतरी, केंद्र सरकारने नाशवंत माल राज्य सरकारने खरेदी केल्यास होणाऱ्या तोट्यामध्ये सहभाग देण्याची तयारी दर्शविली होती. ही चर्चा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली होती. मात्र ती केवळ चर्चा राहिली आहे. प्रत्यक्षात कांद्याची खरेदी आणि भावातील घसरण थांबण्यासाठी मदत झाली नाही. परिणामी, शेतकऱ्यांकडील संपत आलेल्या लाल कांद्याची विक्री पाच रुपये किलो भावाने सुरू आहे. लासलगावमध्ये दोन दिवसांपूर्वी क्विंटलला सरासरी 775 रुपये लाल कांद्याला मिळाले होते. सोमवारी साडेसहाशे रुपयांनी विक्री झाली. पिंपळगावमध्ये हाच भाव साडेपाचशे रुपये राहिला. मनमाडमध्ये पाचशे, तर देवळ्यात 600 रुपये क्विंटल असा सरासरी भाव मिळाला आहे.
मुंबईत साडेदहा रुपये किलो
मुंबईत साडेअकरा रुपये किलो असा भाव कांद्याला मिळत होता. सोमवारी साडेदहा रुपये किलो असा भाव मिळाला. औरंगाबादमध्ये पाचशे, तर कोल्हापूरमध्ये 900 रुपये क्विंटल असा सरासरी भाव होता. उन्हाळ कांद्याला क्विंटलला मिळालेला सरासरी भाव रुपयांमध्ये असा ः येवला- 725, लासलगाव- 975, कळवण- 825, मनमाड- 775, देवळा- 750. उन्हाळ कांद्याच्या भावाची स्थिती पाहता, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी भावाने कांदा विकावा लागत आहे. निर्यातीला अनुदानाची जोड देऊन देशात होणारा अतिरिक्त कांदा जागतिक बाजारपेठेत न्यावा या तज्ज्ञांच्या मागणीचा अद्याप विचार झालेला नाही.
कांद्याच्या मागणीत मोठी घट
रमजानसाठी मलेशिया, सिंगापूर, दुबई, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ अशा सर्व ठिकाणाहून कांद्याची मागणी होत असते. मात्र आता लॉकडाउनमध्ये बाजारातील आणि खरेदी केलेल्या कांद्याच्या भावात घसरण होत असल्याने कांदा परदेशात कसा पाठवायचा, अशा दुहेरी प्रश्नांच्या कात्रीत निर्यातदार सापडलेले आहेत. त्यातच, रेस्टॉरंट बंद असल्याने कांद्याच्या मागणीत मोठी घट झालेली आहे.
निर्यातीचे पैसे परदेशातून येण्यासंबंधी अडचणी
श्रीलंकेत अर्थव्यवस्थेची घसरण झाल्याने आयातीचे पैसे तीन महिन्यांनी द्यावेत, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंबंधाने माहिती घेतल्यावर हा निर्णय साखरेसाठी असल्याचे स्पष्ट झाले. मात्र एकुणात परिस्थिती पाहता, कांद्याच्या निर्यातीचे पैसे परदेशातून येण्यासंबंधी अडचणी येण्याची शक्यता वाढली आहे. त्याचा परिणाम, कांद्याच्या निर्यातीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. -विकास सिंह, निर्यातदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.