
गणिततज्ज्ञ द. रा. कापरेकर यांच्या जीवनावर माहितीपटाचे चित्रीकरण
नाशिक : आंतरराष्ट्रीय किर्तीचे थोर भारतीय गणितज्ज्ञ दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर यांची कर्मभूमी असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूल विद्यालयामध्ये अर्जुन कुलकर्णी यांनी द. रा. कापरेकर यांच्या जीवनावर आधारित माहितीपट तयार करण्यासाठी शाळेच्या परिसरात नुकतेच चित्रीकरण केले.
कोण होते गणिततज्ञ कापरेकर ?
साधी राहणी व गणिताच्या ज्ञानातील श्रीमंती असणारे द. रा. कापरेकर सर यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील डहाणू येथे १७ जानेवारी १९०५ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाले. संघर्षमय जीवनात त्यांनी मुंबई विद्यापीठात गणित विषयाची पदवी प्राप्त केली. महाविद्यालयीन शिक्षणात त्यांनी 'रँग्लर परांजपे' हे गणित विषयातील पारितोषिक मिळवले होते. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांना पदव्युत्तर पदवी प्राप्त करता आली नाही. उदरनिर्वाहाच्या निमित्ताने ते नाशिक जिल्ह्यातील देवळाली या लष्करी ठिकाणी आले. ब्रिटिशकालिन स्थापन झालेल्या "कॅन्टोन्मेन्ट बोर्ड हायस्कूल देवळाली कॅम्प"या शाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यांची राहणी अत्यंत साधी होती धोतर, कोट, टोपी असा पेहराव होता त्यामुळे त्यांची हेटाळणी होत असे. शाळेत ते सायकल घेऊन येत. त्यांच्या गणित विषयाच्या संशोधनाची दखल भारतात लवकर घेतली गेली नाही. मात्र १९७५ यांची वर्षी अमेरिकन थोर गणितज्ञ प्रा. मार्टीन गार्डिनर यांनी कापरेकर सरांच्या संशोधनाची 'सायंटीफीक अमेरिकन' या मासिकात 'कापरेकर्स मॅथेमॅटीकल गेम्स' हा लेख लिहिला. त्यामुळे कापरेकर सरांना जागतिक पातळीवर किर्ती लाभली. 'स्वीडन'च्या 'वर्ल्ड डिक्शनरी ऑफ मॅथेमॅटिक्स' या राष्ट्रीय ग्रंथात कापरेकर सरांच्या नावाचा समावेश केला आहे. 'अॅलाय स्लस' या लेखकाने सरांचे 'डि.आर कापरेकर' या नावाने दोनशे पानांचे चरित्र लिहिले आहे. सरांनी अनेक गमतीदार संख्यांचा शोध लावला आहे.
हेही वाचा: उद्योग, व्यवसायासोबतच नाशिकची कृषी ओळख वाढावी; महसूलमंत्री थोरात
(१) कापरेकर स्थिरांक ४९५,६१७४
(२) हर्षद संख्या
(३) डेम्लो संख्या इ.
अर्जुन कुलकर्णी हे सध्या जर्मनीत गणित या विषयात संशोधन करत आहेत. याप्रसंगी कापरेकर सरांचे माजी विद्यार्थी दिलीप चाटूफळे व स्मिता चाटुफळे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी कापरेकर सरांच्या जीवनातील अनेक दुर्मिळ प्रसंगांना उजाळा दिला. त्यांची जीवनशैली, अध्यापन पद्धती याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे प्राचार्य आर आर गवळी यांनी द. रा. कापरेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. तसेच मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी कापुरे सरांंनी विद्यार्थ्यांना द रा कापरेकर यांच्या शोध संख्यांबद्दल माहिती दिली. यावेळी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ. नलिनी लोखंडे , विज्ञानप्रमुख सौ राजश्री खैरनार, गणित अध्यापक एम बी कापुरे यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मनोज केयूर यांनी केलेल्या चित्रीकरणामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. सौ राजश्री खैरनार यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले. कार्यक्रमास सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. द .रा .कापरेकर सरांच्या उमेदीचा काळ कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळेत व्यतीत झाला आहे. ही समस्त देवळाली वासियांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. कापरेकर सर, कटक मंडळ देवळाली संस्थेच्या गौरवशाली परंपरेचे आधार स्तंभ आहेत.१९८६ या वर्षी त्यांचे निधन झाले.तेंव्हा ते निर्धन होते.परंतु त्यांनी गणित विषयांवर केलेल्या अभुतपूर्व संशोधनाचा खजिना गणित अभ्यासकांना उपलब्ध करून दिला आहे.
हेही वाचा: दगडांच्या देशा : जगाच्या पाठीवर गारगोटीची वेगळी ओळख
Web Title: Filming Of A Documentary On Mathematician D R Kaprekar Life
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..