esakal | गरिबांच्या बिटको, हुसेन रुग्णालयात श्रीमंतांचे अतिक्रमण
sakal

बोलून बातमी शोधा

dr zakir hussain hospital

गरिबांच्या बिटको, हुसेन रुग्णालयात श्रीमंतांचे अतिक्रमण

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : सरकारी रुग्णालयांमध्ये (Government Hospitals) सुमार दर्जाची सेवा मिळत असल्याचे कारण देत एरवी या रुग्णालयाकडे पाठ फिरविणाऱ्या आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांकडून महापालिकेच्या बिटको, झाकिर हुसेन रुग्णालयात दाखल होण्याकडे कल आहे. खासगी रुग्णालयापेक्षा पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याचा आग्रह धरला जात आहे. दोन्ही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन व रेमेडिसिव्हिर इंजेक्शन मिळण्याची शाश्‍वती, हे त्यामागचे प्रमुख कारण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Financially capable people are preferring to be admitted to municipal hospitals)

फेब्रुवारी महिना अखेर कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर महापालिकेने नाशिक रोड विभागातील नवीन बिटको व कथडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील पायाभूत सुविधा अधिक भक्कम केल्या. बिटको रुग्णालयात सध्या बेडची संख्या साडे सातशे तर झाकिर हुसेन रुग्णालयात बेडची संख्या पावणे दोनशेपर्यंत पोचली आहे. नवीन बिटको रुग्णालय उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे रुग्णालय बनले आहे. गेल्यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन महापालिकेने बिटकोमध्ये १९ किलोलिटर, तर हुसेन रुग्णालयात १३ किलो लिटर क्षमतेचा ऑक्सिजन प्लान्ट बसविण्याचा निर्णय घेतला. मार्चच्या मध्यापासून दोन्ही प्लान्ट सुरु झाले. महापालिका सतरा रुपये दराने लिक्विड ऑक्सिजनचे पैसे तायो निप्पॉन कंपनीला अदा करते. करारानुसार कंपनीला महापालिकेच्या प्लान्टमध्ये ऑक्सिजन पुरवठा करणे बंधनकारक आहे. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला तरी ऑक्सिजन पुरविण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. त्यामुळे ऑक्सिजन मिळण्याची शाश्‍वती आहे.

हेही वाचा: साठा संपुष्टात आल्याने रविवारी नाशिक शहरात लसीकरण बंद!

ऑक्सिजन, रेमेडिसिव्हिरची खात्री

एप्रिलच्या अखेरीस शहरात ऑक्सिजन व रेमेडिसिव्हर इंजेक्शनचा अपुरा पुरवठा या दोन अडचणी प्रकर्षाने समोर आल्या. खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची फरफट झाली, तर रेमेडिसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार समोर आला. झाकिर हुसेन रुग्णालयातील २१ एप्रिलची ऑक्सिजन गळतीची घटना वगळता पालिकेच्या दोन्ही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत तक्रार नाही. कंपनीला ऑक्सिजन पुरवठा करणे बंधनकारक असल्याने करारानुसार पुणे येथून नियमित पुरवठा सुरु आहे. खासगी रुग्णालयांमध्ये मात्र अडचण आहे. त्यामुळे पालिकेच्या दोन्ही रुग्णालयांमध्ये खात्रीशीर ऑक्सिजन उपलब्ध असल्याने श्रीमंतांचा कल या दोन्ही रुग्णालयांमध्ये भरती होण्याकडे असल्याचे निरीक्षण पालिकेच्यावतीने नोंदविले आहे. महापालिकेने वीस हजार रेमेडीसिव्हिर इंजेक्शन खरेदी केले असून त्यातील सात हजार इंजेक्शन प्राप्त झाले आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये सहजपणे रेमेडीसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होते, ते देखील मोफत असल्याने हे देखील एक महत्त्वाचे कारण पालिका रुग्णालयांमध्ये रुग्ण भरती होण्याकडे असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.

रुग्णसेवा नाकारणे अशक्य

पालिकेच्या रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी आलेल्या कुठल्याही रुग्णावर सेवा करणे बंधनकारक आहे. त्यामुळे श्रीमंत, गरीब असा भेद करता येत नाही. नियमानुसार सेवा नाकारता येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव नव्हता. त्यावेळी ग्रामिण भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. त्यावेळी देखील रुग्णांना प्रवेश नाकारला नव्हता. त्यामुळे श्रीमंत उपचारासाठी दाखल होत असल्याचे निरीक्षण बरोबर असले तरी उपचार नाकारता येत नसल्याचा दावा करण्यात आला.

हेही वाचा: लसीकरण नोंदणीचा आनंद औटघटकेचा; अनेकांकडून मनस्‍ताप व्‍यक्‍त