Fire Accident : फटाक्यांची आतषबाजी अन् आगीच्या 5 घटना | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Firecrackers fire accident

Fire Accident : फटाक्यांची आतषबाजी अन् आगीच्या 5 घटना

नाशिक : दीपावलीनिमित्त फटाक्यांची आतषबाजी करीत असताना दुर्घटनाही घडतात. मात्र, अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे गंभीर स्वरूपाची दुर्घटना टळली. सोमवारी (ता. २४) लक्ष्मीपूजनानंतर उत्साहात नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. आसमंतात आकर्षक फटाक्यांची रोषणाई होती. मात्र, याच फटाक्यांमुळे शहरात आगीच्या पाच घटना घडल्या. यात एका घराच्या बाल्कनीत आग लागली होती. परंतु अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. (Fire Accident Fireworks 5 incidents of fire in city Nashik Latest Marathi News)

दीपावलीच्या शुभ पर्वाला शुक्रवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर यंदा दिवाळी निर्बंधमुक्त साजरी होत असल्याने नागरिकांमध्ये कमालीचा उत्साह होता. सोमवारी (ता. २४) लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शहर- उपनगरांमध्ये फटाक्यांची आतषबाजी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मात्र यामुळे शहरात काही ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या.

यात पहिली घटना सव्वाआठ वाजेच्या सुमारास पंचवटीतील आरटीओ कार्यालयाजवळील मेहेरधाम परिसरात घडली. यात एका पत्र्याच्या घरावर फटाक्यांमुळे पालापाचोळ्याने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. वेळीच ती आग विझविल्याने दुर्घटना टळली. तर, रात्री सव्वानऊच्या सुमारास पंचवटीतील सेवाकुंज भागात असलेल्या एका भगर मिलच्या आवारातील पत्र्याच्या शेडमधील सामानाने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच पंचवटी अग्निशमनाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविली.

हेही वाचा: Nashik Crime News: नकली पिस्तूल दाखवत लुटण्याचा प्रयत्न; समयसूचकतेमुळे भामटा गजाआड

तर, सिडकोत सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास राणा प्रताप चौकाजवळ असलेल्या हनुमान चौकातील नारळाच्या वृक्षावर फटाका पडल्याने त्या ठिणग्यांनी वृक्षाने पेट घेतला. सिडको अग्निशमन केंद्राच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पेटलेले झाड विझविले. यानंतर काही मिनिटातच वावरे गल्लीत असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीत आग लागली.

शिंगाडा तलाव येथील लिडींग फायरमन श्याम राऊत, गणेश गायधनी, विजय नागपुरे, उदय शिर्के, राजेंद्र पवार, संजय जाधव यांनी तत्काळ घटनास्थळ धाव घेत आग विझविली. घटनेची माहिती सजग नागरिकांनी दिली होती.

हेही वाचा: नाशिक: महाराष्ट्राच्या सुपुत्राला सीमेवर वीरमरण; दिवाळीत गावावर शोककळा