Latest Crime News | संजीवनगरला हवेत गोळीबार; भंगार मार्केट पुन्हा चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gun firing

Nashik Crime News : संजीवनगरला हवेत गोळीबार; भंगार मार्केट पुन्हा चर्चेत

नाशिक : स्क्रॅप मटेरियलच्या कमिशनच्या वादातून बुधवारी (ता. ९) रात्री अंबड-सातपूर लिंकरोडवरील संजीवनगरमध्ये सराईत गुन्हेगाराने हवेत दोन वेळा गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे. गोळीबारानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पोबारा केला. तर पोलीस आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस संशयितांचा शोध घेत अंबड पोलिसात टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सदरच्या घटनेने भंगार मार्केट पुन्हा चर्चेत आला परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. (firing at Sanjeevnagar scrap market back in news Nashik Latest Crime News)

आसिफ शेख असे गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून, साथीदार अली शेख व मुन्ना शेख यांच्यासमवेत तो कारमधून पसार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड-सातपूर लिंक रोडवर कबीला हॉटेल आहे.

याठिकाणी असलेल्या रिलायबल वजन काट्यासमोर बुधवारी (ता. ९) रात्री दहा-साडेदहा वाजेच्या सुमारास सोहेल चौधरी, मुन्ना चौधरी यांच्यामध्ये स्क्रॅप मटेरियलच्या कमिशनच्या व्यवहारातून वादावादी सुरू झाली. सदरचा वाद सोडविण्यासाठी शब्बीर चौधरी हा गेला होता. त्यावेळी गुलाम हुसेन शेख हादेखील त्याच्या साथीदारांसह घटनास्थळी आला व त्याने शब्बीर चौधरी यास शिवीगाळ केली.

हेही वाचा: Nashik Crime News : विनयभंग प्रकरणातील आरोपीला 6 वर्षांचा सश्रम कारावास

सदरचा वाद मिटविण्यासाठीचे प्रयत्न सुरू असतानाच त्याठिकाणी सराईत गुन्हेगारी आसिफ शेख, अली शेख व मुन्ना शेख हे कारमधून आले. कारमधून उतरताच संशयित आसिफ शेख याने त्याच्याकडील बंदुकीतून हवेत दोन राऊंड फायर केले. त्यानंतर घटनास्थळावरून साऱ्यांनीच पोबारा केला. संशयित आसिफही त्याच्या साथीदारांसह कारमधून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, सहाय्य्क निरीक्षक वसंत खतेले, उपनिरीक्षक उत्तम सोनवणे, संदीप पवार यांच्यासह अंबड पोलीस ठाण्याचे पथकाने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अंबड पोलिसात टोळक्याविरोधात आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

हेही वाचा: Nashik Crime News : पैशांच्या देवाण- घेवाणवरून अंबड लिंकरोडवर गोळीबार