जिल्ह्यातील पहिला कोरोनामुक्त रुग्ण म्हणतोय...'परमेश्‍वररूपी डॉक्‍टरांमुळेच कोरोनाच्या विषाणूवर मात'

corona virus2.jpg
corona virus2.jpg

नाशिक : जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा गेल्या 25 मार्चला जिल्ह्यातील पहिला रुग्ण पिंपळगाव नजीक (लासलगाव) येथील 35 वर्षीय तरुण निष्पन्न झाला. त्या वेळी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा हादरली. जिल्हा रुग्णालयात 14 दिवसांच्या उपचारानंतर हा तरुण जिल्ह्यातील पहिला कोरोनामुक्त रुग्ण ठरला. जिल्हा रुग्णालयाचे डॉक्‍टर आणि त्यांच्या टीमने दिलेल्या मानसिक आधारामुळेच या जीवघेण्या कोरोनावर मात करणे शक्‍य झाले. माझ्यासाठी तेच परमेश्‍वरच असल्याची भावना या पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाने "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

क्वारंटाइनच्या 14 दिवसांत इंजेक्‍शन, सलाइन घेण्याची वेळ नाही

लासलगावजवळच्या खेड्यात राहणारा आणि बेकरीचा व्यवसाय असलेल्या 35 वर्षीय तरुणाला 20 मार्चच्या दरम्यान थंडी-ताप आला. स्थानिक डॉक्‍टरांना दाखविले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात गेला. लक्षणे पाहता त्याला 25 मार्चला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. प्रचंड ताप आणि न्यूमोनिया असल्याने स्वॅब पुणे प्रयोगशाळेकडे पाठविले. 27 मार्चला तो कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. हे जेव्हा त्यास सांगितले, तेव्हा मात्र त्याच्या डोळ्यासमोर अंधार आला. मनात प्रचंड भीती निर्माण झाली होती.

सगळ्यांनी मानसिक आधार दिला

जिल्हा रुग्णालयातील कोरोना विषाणू विलगीकरण कक्षात त्याच्यावर उपचार सुरू झाले होते. मात्र, त्याच्यावर उपचार करणारे फिजिशियन डॉ. प्रमोद गुंजाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, कोरोना नियंत्रण कक्षाचे प्रमुख डॉ. अनंत पवार यांच्यासह नर्स, कक्षेतील स्टाफने त्यास मानसिक आधार दिला. त्यामुळे त्यानेही डॉक्‍टरांच्या उपचाराला तितकाच सकारात्मक प्रतिसाद दिला. परिणामी कोरोनासारख्या विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्‍टरांनी जास्त मात्रांचे डोस दिले. जे त्याने लीलया सहन केले. या डोसमुळे तो काही तास निद्रिस्त असायचा. पण त्यामुळे त्याला क्वारंटाइनच्या 14 दिवसांत एकदाही इंजेक्‍शन वा सलाइन घेण्याची वेळ आली नाही. 

तेच माझ्यासाठी परमेश्‍वर 

कोरोनाची लागण झाल्याने डोके बधिर झाले. मात्र, त्या वेळी डॉ. जगदाळे, डॉ. पवार, डॉ. गुंजाळ, कक्षातील नर्स यांनी मानसिक आधार दिला. डॉ. पवार तर त्यांना वाटेल तेव्हा माझ्याशी फोनवर बोलायचे. हे सर माझ्यासाठीच नव्हे, तर सध्या दाखल असलेल्या प्रत्येक कोरोनाबधित व संशयितांसाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. त्यांना सर्वांनी सहकार्य करणे महत्त्वाचे आहे. 

ताप आल्यानंतर आपल्याला कोरोना झाला आहे, याची साधी शंकाही आली नाही. पण जे व्हायचे होते, तेच झाले. कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. पण जिल्हा रुग्णालयाचे डॉक्‍टर, नर्स आणि स्टाफने जो आधार दिला. त्यामुळे आपल्याला कोरोना झाला हेच विसरून गेलो. वैद्यकीय उपचार करणारेच माझ्यासाठी परमेश्‍वर आहेत. - पहिला कोरोनामुक्त रुग्ण, लासलगाव 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com