शेती कामासाठी मजुरांची पळवापळवी; शाळकरी मुलांना मागणी | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

laborers for agriculture work

शेती कामासाठी मजुरांची पळवापळवी; शाळकरी मुलांना मागणी

विराणे (जि. नाशिक) : सध्या रब्बी हंगामातील कामे तालुक्यात सर्वत्र जोरदार सुरू झाली आहेत. कापूस वेचणी, कांदा लागवड, कांदा काढणी, गहू, हरभरा पेरणी आदी कामांना मजुरांची मोठ्या प्रमाणावर गरज भासते. तालुक्यातील मुख्यतः माळमाथ्यातील बहुतांशी मजूर ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेले असल्याने मजुरांची कमतरता परिसरातील शेतकऱ्यांना भासत आहे. मजुरीसाठी शाळकरी मुलांना देखील मागणी आहे.

कामे लवकर आटोपण्यासाठी पळवापळव

कांदा लागवड, कांदा काढणी, कापूस वेचणी आदी कामे शेतकऱ्यांना वेळेवर करावी लागतात. ही सर्व कामे रब्बी हंगामात एकत्रच येतात. याबरोबरच गहू, हरभरा पेरणी, फळबागा, भाजीपाला आदी शेतातील कामे नियमितपणे सुरू असतात. या कामांसाठी मजुरांची नियमित गरज भासते. शेतातील कामे वेळेवर न झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी सर्वत्र मजुरांची शोधाशोध सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी बाहेरच्या राज्यातून तात्पुरत्या स्वरूपात मजूर आणले आहेत. पारंपरिक पडजी पद्धतीने कामे उरकली जात आहेत. कामे लवकर आटोपण्यासाठी मजुरांची पळवापळवी सध्या सुरू झाली आहे.

हेही वाचा: Wakad : वारीला जाण्याची इच्छा अन् शोधला मार्ग

परिसरातील हजारो मजूर बाहेर जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी जातात. सदर मजूर पाच ते सहा महिने बाहेरगावीच असतात. परिणामी, मजुरांची कमतरता मोठ्या प्रमाणात भासते. मजूर मिळत नसल्याने शाळकरी मुलेदेखील शेतात कामे करताना दिसतात. मुले कांदा लागवड, कापूस वेचणीची कामे कुशलतेने सहजरीत्या करतात. मजूर मिळत नसल्याने कामाआधीच पैसे देणे, दरापेक्षा जास्त मजुरी देऊन मजुरांची पळवापळवी सुरू झाली आहे.

पारंपरिक पडजी पद्धत

शेतकरी हजारो वर्षांपासून पडजी पद्धतीचा अवलंब करत आहेत. मजुरी महाग झाल्याने अनेकांना मजुरी देणे परवडत नाही. आपल्या शेतात काम केल्याबद्दल मजुरीचे पैसे न देता मोबदल्यात त्याच्या शेतात कामाला जाणे. या पारंपरिक पद्धतीचा आज कसमादे परिसरात अवलंब केला जात आहे.

हेही वाचा: आदिवासींसाठी बजेटमधील तरतूद वाढवावी : नरहरी झिरवाळ

''शेतातील कामे मजुरांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. कुटूंबातील सर्वांनी कामे करूनदेखील वेळेवर पूर्ण होत नाहीत. मजूर ही शेतीसाठी अविभाज्य बाब आहे. नैसर्गिक संकट, बाजारभाव, महागाईबरोबर मजुरांची कमतरता हे देखील संकटच आहे. वेळेवर मजूर न मिळाल्यास उत्पादनात घट होते.'' - प्रकाश पगार, शेतकरी, विराणे

loading image
go to top