
Folk Art: ग्रामीण भागात आजही होतो लोककलेचा जागर! लग्नसराईमुळे जागरण गोंधळ कार्यक्रमांची रेलचेल
Folk Art : प्राचीन काळापासून विवाह समारंभ निर्विघ्नपणे पार पडावेत यासाठी देवाला साकडे घालण्यात येतात. त्यासाठी हिंदु धर्मात कुलधर्म, कुलाचार करण्यासाठी जागरण-गोंधळाची परंपरा आजही ग्रामीण भागात टिकून आहे.
कुटूंबातील व्यक्ती देव्हाऱ्यातील देव घेऊन जेजुरीला, खंडोबाला भेटून आणले किंवा घरातील कोणत्याही मुला-मुलीचे लग्न जमले, की कुलदैवत खंडोबाच्या वाघ्या-मुरळीच्या जागरणाचा व कुलदेवता तुळजाभवानीच्या गोंधळाचा कार्यक्रम करण्याची प्रथा महाराष्ट्रात शेकडो वर्षापासून सुरु आहे. (Folk art still happens in rural areas ritual in marriage ceremony jagran gondhal nashik news)
पूर्वी या जागरण-गोंधळ कार्यक्रमासाठी जेजुरीहुन वाघ्या-मुरळी येत असत. सध्या सर्वत्र लग्न सराईचा धडाका सुरू आहे. मंगलकार्य असलेल्या घरांत कार्यारंभ करण्यापूर्वी जागरण-गोंधळ करण्याची परंपरा आहे.
यात खंडोबाची तळी भरणे, लंगर तोडून डोक्यावरील ओझे उतरविणे, दिवटी-बुधलीत रात्रभर पेटवून ठेवणे. या जागरणासाठी रात्रभर देवदेवताचे गीत गायन, पोवाडे, देवांच्या कथा सांगितल्या जातात. जागरण-गोंधळ असेल त्या दिवशी सायंकाळी मांसाहारी किंवा शाकाहारी जेवण दिले जाते.
सायंकाळी दिवट्या काढून नैवेद्य दखविण्यात येतो. रात्री दहानंतर जागरण-गोंधळ कार्यक्रमाला सुरवात होते. पहाटेच्या वेळेस लोखंडी कडी असलेल्या साखळीचे लंगर लावले जातात. ज्याच्याकडे जागरण असेल, तो लोखंडी लंगर तोडून डोक्यावरील ओझे उतरविले म्हणून मोकळा होतो.
ही परंपरा ग्रामिण भागात अजुनही टिकून आहे. सध्या सर्वत्र जागरण-गोंधळाचे कार्यक्रम सुरू असल्याने वाघ्या-मुरळींना मोठी मागणी असून, त्यांचे भाव वधारलेले आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
काय असतं जागरण गोंधळात?
जागरणामध्ये पाच पावली, तळी भरणे, कोटम भरणे, घटस्थापना, लंगरतोड, ओझं उतरवणे असे धार्मिक विधी केले जातात. तळी भरताना खंडोबाचा जयघोष केला जातो. ‘कैलास राणा शिवचंद्र मौळी’ या शंकरस्तुतीने जागरणाला प्रारंभ केला जातो.
देवतांना आवाहन करत गण गौळण म्हटली जाते. खंडोबा, म्हाळसा, बाणाई यांचे वर्णन करणारे मल्हारी कथन केले जाते. या सर्व पात्रांची नाट्यरूपी कथा सादरीकरण वाघ्या-मुरळी करतात. जागरणाचे पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग होतात.
यामध्ये खंडोबाने दैत्यांचा केलेला संहार, खंडोबा- म्हाळसेचे लग्न, खंडोबा- बाणाईचे लग्न, खंडोबा, म्हाळसा, बाणाई यांचा प्रणय प्रसंग व विरहाचे वर्णन केले जाते. याचसोबत नल-दमयंती, हरिश्चंद्र-तारामती, सत्यवान-सावित्री आदींच्या कथादेखील नाट्यरूपात सादर करतात.
देवाचे दैवी रुप आणि मानवी रुप सादर करुन खंडोबाच्या जीवनाचे दर्शन घडते. गायन, नृत्य, वादन, सादरीकरणात वाघ्या-मुरळींसह यजमानही तल्लीन होऊन जातात.
"जागरण-गोंधळ ही महाराष्ट्राची पारंपरिक लोककला आहे. तीचे स्वरुप आता बदलले असले, तरी ती सादर करण्यामागची भावना ही मूळ आहे. यातून महाराष्ट्राच्या परंपरेचे आणि संस्कृतीचे दर्शन घडते. ही लोककला आणि लोककलावंत टिकले पाहिजेत आणि पिढ्यान्पिढ्या ही संस्कृती समृद्ध होत राहिली पाहिजे."-दत्तात्रय पोटे, कोठुरे
"लग्नसराईचा हा हंगाम आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो. ग्रामीण भागात कुलदैवतांचा कुलाचार पूर्ण केला जातो. श्रद्धेपोटी जागरण- गोंधळ घालणारे आणि त्यासाठी रात्रभर नृत्य करून घाम गाळणारे लोककलावंत आता मोजकेच राहिले आहेत." -चिंधु हांडोरे, कोळवाडी