
Nashik Fraud Crime : Franchiseच्या नावाने साडेसात लाखांची फसवणूक
नाशिक : फ्रॅन्चायसी देण्याच्या बहाण्याने संशयितांनी एकाला साडेसात लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात आयटीसी कंपनीचे प्रतिनिधी, गोविंदनगर येथील एसबीआय व कोलकत्त्यातील पीएनबी बँक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (fraud of seven half lakhs under name of Franchise Nashik Crime news)
अविनाश नारायण पवार (रा. ऋषिराज हॅबिटॅट, वृंदावन लॉन्सजवळ, गंगापूर रोड, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची नाशिकमध्ये विनीत एंटरप्रायजेस नावाची फर्म आहे. त्यांना आयटीसी कंपनीची फ्रॅन्चायसी घ्यायची होती. या संदर्भातील सोशल मीडियावर जाहिरात पाहून त्यांनी संपर्क साधला होता.
त्यावेळी 8346002123, 8370951232, 9748302880 या मोबाईलवरून संशयित व आयटीसीच्या मेल आयडीवरुन प्रदीपकुमार, राकेश त्रिपाठी व चार्ल्स अॅन्टोनी या संशयितांनी पवार यांना संपर्क करून फ्रॅन्चायसी देण्याचे आमिष दाखविले.
जीएसटी आणि रजिस्टरच्या नावाखाली पीएनबी खाते क्रमांक 1663100100005371 आणि 4754001700014397 या दोन्ही खात्यांवर 7 लाख 29 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यावरून पवार यांना यासंदर्भात संशय आला.
फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी नाशिक शहर सायबर पोलिसांत धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली गुन्ह्याचा तपास करत आहेत
हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली
पैसे बिहारमध्ये गेले
पवार यांनी पैसे भरताना बँक स्लीपवर अकाउंट नंबर व आयएफसी कोड टाकला होता, मात्र, पैसे कोलकत्ता येथील बँक खात्यात क्रेडीट होणे आवश्यक असताना ते बिहारला वळते झाल्याचे समोर आले आहे.
बँकेचाच व्यवहार संशयास्पद
ग्राहकाने एनईएफटी व्यवहार करताना बँकेच्या स्लिपवर शाखा व आयएफएससी कोड चुकीचा नमूद केल्यास आर्थिक व्यवहार होत नाही. ग्राहकाला त्याची माहिती देणे बंधनकारक आहे.
तरीही गोविंदनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आणि कोलकत्त्यातील पंजाब नॅशनल बँकेच्या सारणी येथील बँक व्यवस्थापनाने पवार यांना व्यवहाराची माहिती दिली नाही. त्यामुळे आर्थिक व्यवहार करून फसवणूक करणाऱ्यांना बँक व्यवस्थापनाने मदत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.