शेतकऱ्यांनो सावधान! चंदन लागवडीचे आमिष दाखवणारी टोळी सक्रिय | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sandalwood

शेतकऱ्यांनो सावधान! चंदन लागवडीचे आमिष दाखवणारी टोळी सक्रिय

देवळा (जि. नाशिक) : शेतकऱ्यांनो सावधान..! राज्यात चंदन लागवडीचे आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी सक्रिय झाली असुन, या टोळीने देवळा, चांदवड व मालेगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. या प्रकरणी मंगळवारी (ता. २२) देवळा पोलिसांत अशा पद्धतीने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: पुणे : चंदन तस्करी प्रकरणात एकास पकडले

अनेकांना चढलाय 'पुष्पा' फिव्हर

सध्या गाजत असलेल्या पुष्पा (Pushpa) चित्रपटातील चंदन तस्करी (Sandal Smuggling) व त्यातून मिळणाऱ्या कोट्यवधींच्या उत्पन्नाचे गारुड सध्या अनेकांवर आहे. नेमकी हीच बाब हेरुन तामिळनाडू(Tamilnadu) राज्यातून आलेल्या सात ते आठ ठगांनी श्रीलक्ष्मी गणपती नर्सरी कंपनीच्या नावाने देवळा, मालेगाव व चांदवड तालुक्यांच्या हद्दीवरील गिरणारे, कुंभार्डे, झाडी, कोकण खेडे, उसवाड या गावांतील शेतकऱ्यांना रक्तचंदनाच्या रोपांची लागवड करण्याचे आमिष दाखवत जाळ्यात ओढले व लाखो रुपयांचा गंडा घालून पोबारा केल्याने गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

हेही वाचा: देशातील मोठा चंदन तस्कर बादशाह मलिकला अटक; इडीची कारवाई

रक्तचंदनाचे झाड लावण्यासाठी प्रति झाड २०० रुपये भरा आणि त्याबदल्यात दोन हजार रुपये अनुदान देणार असल्याचे सांगत फसवणूक केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ही सरकारी योजना(Government Scheme) आहे आणि या विभागाचे अधिकारी येऊनच तुम्हाला अनुदान वाटप करतील, असे हे तथाकथीत कंपनीचे प्रतिनिधी सांगत होते. त्यामुळे शेतकरी त्यास भुलले. एवढेच नव्हे, तर त्यांनी काही शेतकऱ्यांना रोपेही आणून दिली आणि जास्त रोपे घेतल्यास तुम्हाला बोअरवेल, तारेचे कुंपण करून देऊ, रक्त चंदनाच्या झाडाचे येणारे उत्पादन खरेदी करण्याची हमी दिल्याने शेतकरी लाखो रुपयांची गुंतवणूक करत गेले. मात्र, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कंपनीशी संपर्क होत नसल्याने आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. याबाबत गिरणारे (ता. देवळा) येथील शेतकरी विनोद कौतिक खैरनार यांच्या ४ लाख २० हजार रुपयांच्या फसवणूकीबद्दल देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वच शेतकऱ्यांची गोळाबेरीज करता हा आकडा बराच मोठा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विक्रांत कचरे व हवालदार चंद्रकांत निकम, पोलिस नाईक निलेश सावकार, मोठाभाऊ बच्छाव तपास करीत आहेत.

''आंध्र प्रदेशातून आलेल्या सात- आठ जणांनी शासकीय योजना दर्शवत चंदनाचे झाड लावण्याचा आग्रह धरला. याचे महत्व पटवून देण्यासाठी सात ते आठ वर्षांनंतर एका झाडापासून १० ते २० किलो उत्पादन भेटेल आणि किलो मागे ८ ते ९ हजार रुपये उत्पन्न मिळेल, असे पटवून देत आमच्याकडून प्रति रोप पैसे उकळले. यात आमची फसवणूक झाली आहे.'' - विशाल खैरनार, शेतकरी (ता. देवळा)

हेही वाचा: जमावाच्या सुरक्षेतून ‘पुष्पा’ला पकडले; नाशिक पोलिसांची जालन्यात कारवाई

"आमच्या परिसरातही आम्हा शेतकऱ्यांना आमिष दाखवत २ फेब्रुवारीला अग्रीमेंट करून दोन हजार रुपये अनुदान देऊ असे सांगत दोनशे रुपये प्रमाणे चंदनाचे रोप असल्याचे सांगितले. काही ठिकाणी रोपे दिल्याने शेतकरी पैसे देत गेले. यामुळे मोठी फसवणूक झाली आहे." - प्रताप पाटील, शेतकरी, झाडी (ता. मालेगाव)

Web Title: Fraudulent Gang Active In Sandalwood Farming

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..