ग्रामपंचायतीच्या आवारातच अंत्यविधी; प्रशासनाचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

funeral

ग्रामपंचायतीच्या आवारातच अंत्यविधी; प्रशासनाचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर


सोग्रस (जि. नाशिक) :
तीन स्मशानभूमी; पण प्रत्येकला तार कंपाऊंड... अशा परिस्थितीत अंत्यविधीसाठी गेलेल्या नातलगांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारातच चिता रचून मृतदेहाला अग्निडाग दिला. शनिवारी (ता. १६) ही घटना घडली चांदवड तालुक्यातील खडकजांब येथे. ग्रामपंचायत प्रशासनाचा बेजबाबदारपणा यानिमित्ताने चव्हाट्यावर आला असून, तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

प्रशासनाचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर

अमोल अशोक कोकाटे (वय २४, रा. खडकजांब, ता. चांदवड) या युवकाने शुक्रवारी (ता. १५) दुपारी पाचच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भात कुटुंबियांनी वडाळीभोई पोलिस ठाण्यात माहिती कळवली. ग्रामस्थांनी अमोलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वडाळीभोई शासकीय रुग्णालयात नेला. त्यानंतर शनिवारी (ता. १६) सकाळी नऊच्या सुमारास मृतदेह अंत्यविधीसाठी खडकजांब येथील रूढी- परंपरेनुसार गावातीलच स्मशानभूमीमध्ये नेला. परंतु, तेथील स्मशानभूमीत तारकंपाउंड होते. त्यामुळे इतर दोन ठिकाणच्या स्मशानभूमीत मृतदेह नेण्यात आला असता त्या स्मशानभूमी देखील बंदिस्त होत्या. या प्रकारामुळे नातलगांचा संताप अनावर झाला. ग्रामपंचायत प्रशासनाच्या ढिम्म कारभाराच्या निषेधार्थ नातलगांनी अमोलच्या मृतदेहावर खडकजांब ग्रामपंचायत आवारातच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा: दुमजली घराला आग; लाखो रूपयांचे साहित्य, संसारोपयोगी वस्तू जळाल्या

ग्रामपंचायतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच चिता रचून अमोलला अखेरचा निरोप देण्यात आला. यासंदर्भात काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या जबाबदार संबंधित पदाधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली. परंतु, घटनास्थळी वेळेवर कोणीही उपस्थित झाले नाही. अखेर अमोलच्या अंत्यविधीचे संपूर्ण सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर काही शासकीय कर्मचाऱ्यांनी तेथे हजेरी लावली. याप्रकरणी वडाळीभोई पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

''ग्रामपंचायतीने पुर्वापार स्मशानभुमीची व्यवस्था केली आहे. परंतु, ती जागा एन-ए झाल्यामुळे संबंधित मालकाने तारकंपाऊंड बांधले आहे. याबाबत ग्रामसेवकाला सूचित करण्यात आले असून, दोन दिवसात न्यायालयाकडून परवानगी घेऊन स्मशानभूमि खुली करण्यात येईल.'' - महेश पाटील, गटविकास अधिकारी, चांदवड

हेही वाचा: वैफल्यग्रस्त भाजपकडून राज्यात दंगलीचा कट - संजय राऊत

Web Title: Funeral In The Gram Panchayat Office Premises Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..