'ती'चे पाऊल घरात पडताच झाली भरभराट; ऋणातून मुक्त होण्याच्या भावनेतून गाईचे उत्तरकार्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cow

ऋणातून मुक्त होण्याच्या भावनेतून गाईचे उत्तरकार्य

वडेल (जि. नाशिक) : ओवाळणीत भावाकडून मिळालेल्या गाईच्या तब्बल ३५ वर्षांच्या साथसंगतीमुळे झालेल्या घरादाराचा कायापालट व उन्नत झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे गाईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तिच्या निधनानंतर तिची अंत्ययात्रा व उत्तरकार्य करून तिच्या ऋणाप्रती कृतज्ञतेची भावना ठेवणारे तालुक्यातील डाबली येथील शेतकरी संतोष निकम हे सर्व शेतकऱ्यांसाठी आदर्श उदाहरण ठरले आहेत.

गाय घरात येताच झाली भरभराट

डाबली (ता.मालेगाव) येथील शेतकरी संतोष निकम यांच्या पत्नी अनुसया निकम यांना त्यांचे बंधू अशोक घुले यांनी पस्तीस वर्षांपूर्वी घरची वासरी ओवाळणीत भेट दिली होती. त्यावेळी अनुसया व संतोष या आपल्या बहिण मेहुण्याची परिस्थिती गरीबीची असल्याने त्यांच्या प्रपंचाच्या आर्थिक प्रगतीत हातभार लागावा म्हणून पशूपालनाच्या हेतूने दिलेल्या या वासरीने संतोष निकम यांच्या घरी उभ्या आयुष्यात तब्बल एकोणीस वासरांना जन्म दिला. त्यापैकी अनेक कालवडी व गोऱ्हे आजही निकम यांच्या गोठ्यात असून या गायीमुळे निकम यांच्या गोठ्यात मोठ्या प्रमाणात गोधन आले.

या गोधनाच्या माध्यमातून दूध विक्री व शेतातील शेणखताच्या वापराने निकम यांची भरभराट होऊन त्यांनी नविन शेती खरेदी केली. आधुनिक शेती अवजारे घेतली. आर्थिक सुबत्तेला कारणीभूत ठरलेल्या कामधेनूचे अकरा नोव्हेंबरला वृद्धापकाळाने निधन झाले. या गाईचा अंत्यविधीही विधीवत करून तिचा पंचक्रीया विधी करीत तिच्या स्मरणार्थ नंदलाल महाराज महडकर यांचे प्रवचन आयोजित केले होते. तसेच गायीच्या उत्तरकार्यात मुंडण करून व गावजेवण देऊन हिंदू धर्म पद्धतीने सर्व विधी पार पाडून कामधेनू ठरलेल्या गाईच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :NashikfuneralCow