Ganeshotsav 2022 : विकेंडला भाविक घेणार देखाव्याचा आनंद | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpati Decoration

Ganeshotsav 2022 : विकेंडला भाविक घेणार देखाव्याचा आनंद

नाशिक : दोन वर्षांच्या खंडानंतर वाजतगाजत गणरायाचे आगमन झाले. श्रींच्या आगमनामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर सार्वजनिक गणेश मंडळांमध्येही उत्साह संचारला असून, आरास व देखाव्यांची कामे जोमाने केली जात आहेत. दरम्यान, शनिवारी (ता. ३) व रविवारी (ता. ४) सुटी असल्याने शहरातील ‘श्रीं’ची आरास व देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. (Ganeshotsav 2022 Devotees will enjoy spectacles during weekend Nashik Latest Marathi News)

मात्र, सध्या शहरात सायंकाळनंतर पावसाची जोरदार हजेरी असते. त्यामुळे भाविकांच्या देखावे पाहण्याच्या आनंदावर सावट असणार आहे. तर, दुसरीकडे गणेशोत्सवासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात असून, सायंकाळी वाहतूक मार्गात बदलही करण्यात आलेले आहेत. सुटीमुळे भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टिकोनातून जादा पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे गणेशोत्सवात अनेक निर्बंध लादले होते. त्यामुळे भाविकांच्या उत्साहावर पाणी फिरले होते. दोन वर्षांनंतर पुन्हा त्याच उत्साहाने गणेशोत्सव साजरा होत असल्याने भाविकांसह सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये उत्साह पहावयास मिळतो आहे. भव्य मंडप, भव्य देखावे अन् आरास गणेश मंडळांनी साकारले आहेत.

दोन वर्षांनी भाविक निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करीत असल्याने आरास व देखावे पाहण्यासाठीही मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यातच, यंदाच्या गणेशोत्सवाच्या चौथा, पाचवा दिवस शनिवार- रविवारी येत आहे. याच दिवशी शहरातील औद्योगिक वसाहतीला सुटी असते. शासकीय कार्यालयासह काही खासगी आस्थापनांनाही सुटी असते.

त्यामुळे सुटीची संधी साधून भाविक गणपतीचे देखावे व आरास पाहण्यासाठी सायंकाळी मोठ्या संख्येने घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेत गर्दी होण्याची दाट शक्यता गृहित धरून पोलिस यंत्रणेकडून जादा बंदोबस्ताचे नियोजनही केले आहे.

वाहतूक पर्यायी मार्गाने

गणेशोत्सव काळात शहराच्या मुख्य भागात होणाऱ्या गर्दीची शक्यता गृहित धरून शहर पोलिस वाहतूक शाखेने काही रस्त्यांवर सायंकाळी ६ ते मध्यरात्री बारापर्यंत शहर बस, अवजड वाहने, चारचाकी वाहनांसह वाहतुकीला प्रवेश बंदी केली आहे. यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आलेले आहे. विशेषतः रविवार कारंजा, अशोक स्तंभ, शालिमार, भालेकर मैदान या परिसरातून वाहनांना प्रवेश बंदी आहे.

"गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस बंदोबस्त व वाहतुकीचे नियोजन करण्यात आलेले आहे. विकेंडला गर्दी होण्याची शक्यता गृहित धरूनही वाहतूक नियोजन केले जाईल."

- दिनकर कदम, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा.