फोटो : NSK26H32861
नंदुरबार : गरबा महोत्सवाच्या बक्षीस वितरणाप्रसंगी उपस्थित रत्ना रघुवंशी, मेघा रघुवंशी, शितल वसावे, प्रितम ढंडोरे, भावना गुरव, सोनिया राजपूत, ज्योती पाटील आदी.
------------------
‘गरबा रंग- सखी संग’ उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नंदुरबार नगर परिषदेतर्फे आयोजन; विविध मनोरंजक उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १७ : येथील नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे शहरातील माता-भगिनींसाठी आयोजित ‘गरबा रंग- सखी संग’ उत्सवाला महिला आणि लहान मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिराशेजारील डोममध्ये या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक गरब्याच्या उत्साहासोबतच विविध मनोरंजक उपक्रमांमुळे कार्यक्रमात चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाला आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मेघा रघुवंशी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती शितल वसावे, आरोग्य सभापती प्रितम ढंडोरे, बांधकाम सभापती देवेंद्र जैन, शिक्षण विभागाच्या सभापती भावना गुरव, नगरसेविका सोनिया राजपूत, ज्योती पाटील, सायली रघुवंशी, हर्षदा पाटील, शोभा पवार, वंदना साळुंखे, रेखा चौधरी, टीना ठाकूर उपस्थित होते.
महिलांना सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि परस्परांमधील स्नेहभाव वृद्धिंगत करणे, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. गरब्यात विविध गितांच्या तालावर सहभागी महिलांनी उत्सवाची रंगत वाढवली.
कार्यक्रमात ‘बेस्ट ग्रुप’, ‘बेस्ट कॉस्च्युम’, ‘बेस्ट गरबा स्टाइल’ आणि ‘बेस्ट ट्विनिंग’ अशा विविध स्पर्धा झाल्या. याशिवाय लकी ड्रॉ, विविध गेम्स आणि रंजक प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सहभागी महिलांना बक्षिसे देण्यात आली. त्यामुळे कार्यक्रमात मनोरंजनाची आणि उत्साहाची भर पडली. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत, विविध स्पर्धा आणि बचत गटांच्या स्टॉलमुळे ‘गरबा रंग- सखी संग’ हा उत्सव आनंददायी वातावरणात पार पडला. नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या या उपक्रमातून महिलांसाठी मनोरंजन, कलागुणांना वाव आणि बचत गटांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न झाला.