नामपूर बसस्थानकाची झाली कचराकुंडी; प्रवाशांना मन:स्ताप

Nampur Busstand
Nampur Busstandesakal

नामपूर (जि. नाशिक) : येथील मध्यवर्ती बसस्थानकात (busstand) उघड्या गटारींमुळे पसरलेली दुर्गंधी, आवारातील मोकळ्या जागेचा कचराकुंडीसाठी होणारा वापर, आवारात वाढलेल्या काटेरी बाभळी, मोकाट जनावरांचा मुक्तसंचार, आवारात झालेले निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण यामुळे बसस्थानकाची अक्षरश: कचराकुंडी (Garbage Bin) झाली आहे. एसटी प्रशासनाने (MSRTC) याकामी लक्ष घालून तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे. अन्यथा, आंदोलनात्मक पवित्रा स्विकारण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Garbage dumped at Nampur bus stand people Annoyed Nashik News)

मोसम खोऱ्याची मध्यवर्ती व्यापारी बाजारपेठ म्हणून शहराचा विकास होत आहे. भविष्यातील तालुका म्हणूनही नामपूरकडे पाहिले जाते. परिसरातील ३० ते ३५ खेड्यांचा सहवास लाभला आहे. त्यामुळे बंदचा अपवाद वगळता दिवसभर मोठ्या संख्येने प्रवाशांची बसस्थानक परिसरात वर्दळ असते. परंतु, बसस्थानकात प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याने प्रवासी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. बसस्थानकात प्रवेश करतानाच वर्षानुवर्षे स्वच्छ न झालेल्या गटारींच्या दुर्गंधीने प्रवाशांचे स्वागत होते. बसस्थानकाच्या आवारात अनेक वर्षांपासून काटेरी बाभळी आहेत. मोकाट जनावरांचा मुक्तसंचार असल्याने अस्वच्छतेत भर पडली आहे. परिसरातील नागरीक कचरा फेकण्यासाठी बसस्थानकाची निवड करतात. अनेक दिवसांपासून लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेले स्वच्छतागृह कार्यान्वित करण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गटारी तुंबल्यामुळे पावसाळ्यात बसस्थानक परिसरात पाण्याचे तळे साचलेले असते. दोन वर्षांपूर्वी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गटारीचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु, बसस्थानकातून गटार होणार असल्याने एसटी प्रशासनाने आक्षेप घेतल्याने काम अद्यापही अपूर्णवस्थेत होते. गेल्या महिन्यापासून पुन्हा गटारीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागांच्या वतीने सुरु करण्यात आले आहे. परंतु, अस्वच्छ व खुल्या गटारीमुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पाणी नसल्याने विकतचे पाणी घेऊन नागरिकांना आपली तहान भागवावी लागत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी विविध सेवाभावी संस्थांकडून बसस्थानकात ठेवण्यात आलेल्या सिमेंटच्या बाकांचीही मोडतोड करण्यात आली आहे.

Nampur Busstand
Nashik : तांबे चोरी प्रकरणी 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

एसटी प्रशासनाने याकामी पुढाकार घेऊन बसस्थानकातील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती अशोक सावंत, जेसी गटाचे नेते विलास सावंत, पंचायत समिती सदस्या कल्पना सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. गुलाबराव कापडणीस, जीभाऊ मोरे, त्र्यंबक सोनवणे, प्रसाद अलई, बाजार समितीचे संचालक अविनाश सावंत, माजी सरपंच प्रमोद सावंत, महाराजा ग्रुपचे अध्यक्ष अनिल सावंत, ग्रामपंचायत सदस्य केदा सोनवणे, नारायण सावंत, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण सावंत, शिवसेनेचे तारिक शेख, समीर सावंत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष सतीश विसपुते, शहराध्यक्ष रविंद्र देसले, मोसम प्रतिष्ठानचे गणेश खरोटे, सुनील निकुंभ, सुरेश कंकरेज, राजू पंचाळ, आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष किशोर मोरे आदींनी केली आहे.

Nampur Busstand
ITI चे 3 विषयांचे एकत्रीकरण; ED, WCS आणि थेअरीची एकच 100 गुणांची परीक्षा

"शहराचे होणारे व्यापारीकरण, दैनंदिन होणारी आर्थिक उलाढाल लक्षात घेता ‘बांधा, वापरा, आणी हस्तांतरित करा’ या तत्वावर एसटी प्रशासनाने येथील मध्यवर्ती बसस्थानकात व्यापारी संकुलाची निर्मिती करावी. गरजू व्यापाऱ्यांना गाळ्यांचे वाटप केल्यास मध्यवर्ती बसस्थानक परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्‍न आपोआप मार्गी लागू शकतो."

- विलास सावंत, जेसी गटाचे नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com