दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याला व्हा सज्ज! - बाळासाहेब थोरात

balasaheb-thorat.jpg
balasaheb-thorat.jpg

लासलगाव (जि. नाशिक) : शेतकरी आणि कामगार कायद्यांच्या विरोधात काँग्रेसने आज दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याला सज्ज व्हा, असा नारा दिला. या संबंधाने बोलताना महसूलमंत्री तथा काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकार हुकूमशहा असून, ते लोकशाही डुबवण्याकडे चालले असल्याचा आरोप केला. त्याचबरोबर शेतकरी आणि कामगारविरोधी कायदे तत्काळ मागे घ्यावेत, या मागणीसाठी काँग्रेसतर्फे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली १४ नोव्हेंबरला दिल्ली येथे राष्ट्रपतींना एक कोटी सह्यांचे निवेदन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

त्यामुळे बाजार समितीचे अस्तित्व संपणार
केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी काँग्रेसतर्फे राज्यस्तरीय आंदोलनाची सुरवात करण्यात आली. राज्यभरात ‘किसान मजदूर बचाओ’ दिवस पाळण्यात आला. जिल्हा व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी पक्षातर्फे आंदोलन छेडण्यात आले. थोरात यांच्या नेतृत्वाखाली लासलगावला धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी थोरात म्हणाले, की कृषीविषयक तीन कायदे घाईघाईने मंजूर करण्यात आली. त्यामुळे बाजार समितीचे अस्तित्व संपणार असून, शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती आहे. त्याचप्रमाणे आधारभूत किमतीखाली माल खरेदी करू नये, याबाबत साशंकता वाटते. त्यामुळे कृत्रिम टंचाई वाढून साठेबाजीचे पेव फुटेल. परिणामी सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडेल. 

मोदी सरकारवर टीकास्त्र 
थोरात यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की नोटाबंदी, जीएसटी, पेट्रोल दरवाढ, आर्थिक मंदीची लाट, बेरोजगारीचा प्रश्‍न अशी मोठी संकटं देशासमोर आहेत. त्यात पुन्हा केंद्र सरकारने चुकीच्या पद्धतीने लॉकडाउन केल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झाली आहे. 
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या भजनाने आंदोलनाची सुरवात झाली. त्यानंतर शेतकरीविरोधी कायदा रद्द करण्यासाठी राष्ट्रपतींना देण्यात येणाऱ्या निवेदनावर प्रातिनिधिक स्वरूपात थोरात, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, सांगलीच्या जयश्री पाटील यांनी सह्या केल्या. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, गुणवंत होळकर, राजाराम पानगव्हाणे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची भाषणे झाली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, नाशिक शहराध्यक्ष शरद आहेर, आमदार हिरामण खोसकर, मालेगाव बाजार समितीचे माजी सभापती प्रसाद हिरे, माजी आमदार शिरीष कोतवाल, ॲड. अनिल आहेर, अश्‍विनी बोरस्ते, डॉ. हेमलता पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, दत्तात्रय डुकरे, रश्मी पालवे, ब्रिजकिशोर दत्त, मधुकर शेलार, डॉ. विकास चांदर, साधना जाधव, निर्मला खर्डे, जगदीश होळकर, शांताराम लाठर, संजय होळकर, ज्ञानेश्‍वर पाटील, मुकुंद होळकर, किशोर कदम, सचिन होळकर, सुरेश कुमावत, योगेश डुकरे, मिराण पठाण, संजय जाधव, असलम शेख आदी उपस्थित होते. डॉ. शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. शेलार यांनी आभार मानले. 

हेही वाचा > माजी सरपंचाच्या पुतण्याचा खून; नदीपलीकडे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ

बाळासाहेब थोरात : राष्ट्रपतींना एक कोटी सह्यांचे देणार निवेदन ​
* जुलमी कृषी विधेयकामुळे शेतकरी व कामगारांना उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचा मोदी सरकारचा डाव असा आरोप 
* शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी ऑक्टोबरमध्ये शेतकरी, कामगार बचाव दिन पाळण्याची घोषणा 
* व्यासपीठावर कार्यकर्त्यांची गर्दी.  

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com