
नाशिक : गिरीश महाजन यांनी पाथर्डीमध्ये धरला गाण्यावर ठेका
इंदिरानगर (जि. नाशिक) : पाथर्डी गावात शुक्रवारी (ता. २९) झालेल्या दिमाखदार जयंती महोत्सवाच्या समारोप प्रसंगी माजी पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी थेट व्यासपीठावर जात आदर्श शिंदे यांच्या गाण्यावर ठेका धरत सादर केलेल्या बहारदार नृत्याला उपस्थित हजारो नागरिकांनी टाळ्या आणि शिट्याची दाद दिली. त्यांच्या हस्ते गायक आदर्श शिंदे आणि प्रमुख संयोजकांचा सत्कार करण्यात आला.
येथील माजी नगरसेवक भगवान दोंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त हा महोत्सव आयोजित केला होता. शेकडो श्रोत्यांच्या उपस्थितीत आदर्श यांची संगीत रजनी बहरली. कोरोनामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर झालेल्या महोत्सवाला तुफान गर्दी झाली होती. पाथर्डी गावाच्या इतिहासात पहिल्यांदा एखाद्या कार्यक्रमाला एवढी गर्दी झाल्याचे येथील जाणकारांनी सांगितले. शहराच्या विविध भागासह आसपासच्या खेड्यातील नागरिकांच्या गर्दीमुळे देवळाली- पाथर्डी रस्त्याची वाहतूक पोलिसांना एकेरी करावी लागली. स्थानिक कलाकारांनीदेखील रमाबाई आंबेडकरांवर नाटिका सादर केल्या. माजी मंत्री महाजन यांनी ग्रामीण भागात अशा प्रकारच्या महोत्सवातून स्थानिक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ मिळते. त्याद्वारे स्थानिक कलाकारांच्या कलेला न्याय देता येतो, असे सांगितले. उपस्थित असलेल्या मान्यवरांचे सम्राट सोशल ग्रुपतर्फे संदीप भगवान दोंदे आणि शैला दोंदे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
या वेळी आमदार सीमा हिरे, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, विजय साने, माजी महापौर सतीश कुलकर्णी, माजी नगरसेवक सतीश सोनवणे, ॲड. श्याम बडोदे, दिनकर पाटील, शिवाजी चुंबळे, मुकेश शहाणे, राकेश दोंदे, सोमनाथ बोराडे, उत्तम दोंदे, गौतम दोंदे, सुधीर दोंदे, तानाजी गवळी, रावसाहेब डेमसे, प्रदीप दोंदे, विष्णू डेमसे आदींसह पाथर्डी गावातील सर्वपक्षीय नेते, शहरातील विविध पक्षांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. माजी नगरसेवक दोंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.