
Goda Janmotsav : मंगल वाद्याच्या गजरात गोदा जन्मोत्सव! 4 फेब्रुवारीपर्यंत धार्मिक कार्यक्रम
नाशिक : भगिरथ प्रयत्नाने पृथ्वीतलावर अवतीर्ण झालेल्या श्री गंगा गोदावरीचा जन्मोत्सव आज दुपारी बाराला रामतीर्थावर मंगल वाद्याच्या गजरात गुलाल व पुष्पवृष्टी करून साजरा करण्यात आला. जन्मोत्सवानिमित्त पुरोहित संघातर्फे प्रतिपदेपासून ४ फेब्रुवारीपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (Goda Janmotsav in sound of mangal instruments Religious events till February 4 nashik news)
श्री गंगा गोदावरीच्या जन्मोत्सवानिमित्त पुरोहित संघातर्फे दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही २२ जानेवारीपासून ४ फेब्रुवारीपर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त शाळकरी विद्यार्थ्यांसाठी श्रीरामरक्षा, मनाचे श्लोक, संहितापठन, भावगीत, भक्तिगीते, श्री गणपती अथर्वशीर्ष, फॅन्सी ड्रेस, गीतापठण, रांगोळी, चित्रकला, शाळकरी मुलांसाठी लेझीम आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. येत्या शनिवारी (ता.४) सायंकाळी बक्षीस वितरण होईल.
उद्या कथक नृत्याविष्कार
गोदा जन्मोत्सवानिमित्त पुरोहित संघातर्फे आठवडाभर विविध कार्यक्रम पार पडले. मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी सहाला नृत्यानंद कथक अकादमीच्या कीर्ती शुक्ल व त्यांच्या शिष्या कथन नृत्याविष्कार सादर करणार आहे.
बुधवारी (ता.१) पुष्कराज भागवत यांच्या स्वरतीर्थ या सुरेल भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (ता.२) रामसेतूसमोरील शुक्ल यजुर्वेदीय संस्थेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी केले आहे.
हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
महाआरती उत्साहात
जन्मोत्सवानिमित्त रामतीर्थावर मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी सातला गोदावरीची महाआरती उत्साहात झाली. यावेळी नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाआरतीनंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
साचलेल्या पाण्यातच जन्मोत्सव
गत दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडूनही सध्या गोदापात्र रिकामेच आहे. स्मार्ट सिटीच्या कामासाठी धरणातून नदीपात्रातील विसर्ग थांबविण्यात आला आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही गोदेच्या साचलेल्या पाण्यातच जन्मोत्सव व महाआरती सोहळा पार पडला. त्याबद्दल जन्मोत्सव व महाआरतीसाठी उपस्थित असलेल्या अनेकांनी नाराजी व्यक्त केली.