
धार्मिकनगरीतील ‘भोंगा’यण; ‘भोंगा लावण्याबद्दल मी काय बोलावे?’ : राज्यपाल
नाशिक : मनसेचा (MNS) बालेकिल्ला म्हणून एकेकाळी ओळख असलेल्या नाशिक या धार्मिकनगरीमध्ये ‘भोंगा’यण सोमवारी (ता. २) चांगलेच रंगले. राज ठाकरे यांनी भोंग्याप्रश्नी दिलेल्या इशाऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हुकूमशाही चालणार नाही आणि कायद्याच्या विरोधात वागल्यास पोलिस कारवाई करतील, असा इशारा पत्रकार परिषदेत दिला, तर ‘भोंगा लगाओ या न लगाओ, आपका मामला है वो, उसमें मैं क्या बोलू?’ असे म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी कायदा-सुव्यवस्था हा विषय राज्य सरकार (State Government) सांभाळेल, असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. (Governor Bhagat Singh Koshyari statement on Loudspeaker Nashik Political News)
राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरणानिमित्त झालेल्या कार्यक्रमात श्री. पवार यांनी भोंग्याच्या विषयाला हात घातला. ते म्हणाले, की भोंगा वाजवा, भोंगा काढा यातून नोकरी मिळणार की रोजीरोटी, हा खरा प्रश्न आहे. आताचे प्रश्न सोडून जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर प्रदेशामध्ये मशिदीवरील (Masjid) भोंगा काढल्याचे म्हटले जाते. पण त्याच वेळी पहाटे मंदिरावरील सुरू असलेला ध्वनिक्षेपक बंद झाला आहे, याकडे लक्ष वेधून श्री. पवार म्हणाले, की न्यायालयाने ध्वनिक्षेपकाचा आवाज किती असावा हे स्पष्ट केले आहे. लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा अधिकार असला, तरीही कायदा-सुव्यवस्था अडचणीत येणार असेल, तर पोलिस त्यांचे काम करतीलच. घरी बसून अथवा सभेत बोलायला काय जाते? चिथावणीखोर भाषण करून भडकावणे सोपे आहे.
हेही वाचा: बोलणाराचं जेवढे वय, तेवढे वर्षे पवार साहेबांची राजकीय कारकीर्द! - अजित पवार
पवारांनी तसले राजकारण नाही केले
राज ठाकरे यांनी मागील भाषण ‘रिपीट’ केले, असे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उत्तर दिले असून, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale), माजी खासदार राजू शेट्टी यांनी शरद पवार यांनी जातीपातीचे राजकारण केले नसल्याचे म्हटल्याचे उदाहरण दिले. औरंगाबादला झालेल्या सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी परवानगी देताना दिलेल्या नियमांचे पालन केले की नाही हे पोलिस पाहतील. नियमांचे पालन केले नसल्यास पोलिस कारवाई करतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे काम महात्मा फुले यांनी केले असल्याने राज ठाकरे यांनी इतिहास नीट पाहावा. आज तो विषय महत्त्वाचा नाही. उष्णतेची लाट, भारनियमन, कोळशाचा तुटवडा, इंधनाची दरवाढ या प्रश्नांवर त्यांनी बोलणे अपेक्षित आहे. मात्र राज ठाकरे यांचे मनपरिवर्तन झाले असल्याने ते राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बोलत आहेत.
हेही वाचा: छत्रपतींच्या समाधीसाठी टिळकांनी खडाही लावला नाही : छगन भुजबळ
फुलेंनी शोधली महाराजांची समाधी : भुजबळ
पुरंदरे, रामदास स्वामी आणि लोकमान्य टिळक यांचे गुणगान गायचे आणि शरद पवार यांना जातीयवादी ठरवायचे यासाठी राज ठाकरे यांची सभा होती की काय, असा प्रश्न उपस्थित करून पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhuhjbal) यांनी द्वेष वाढविण्याचा प्रकार असल्याचे प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या हृदयात आहेत. लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली हे राज ठाकरे यांचे विधान धादांत खोटे आहे. इतिहासानुसार समाधी शंभू महाराजांनी बांधली. पेशव्यांनीसुद्धा समाधीकडे दुर्लक्ष केले, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. महात्मा फुले यांनी समाधी शोधली आणि साफसफाई केली.
शिवजयंती पहिल्यांदा साजरी केली. लोकमान्य टिळकांनी समाधीसाठी निधी जमा केला. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी निधी दिला. पण ज्या बँकेत पैसे होते, ती बुडाली, असे उत्तर टिळकांनी इंग्रजांना दिले आहे. अखेर इंग्रजांनी छत्री बांधली हा इतिहास आहे. टिळकांनी दोन वेळेस शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु समाधी सापडली नाही. उलट नानासाहेब पेशव्यांच्या समाधीची पूजा केली. इंद्रजित सावंत या इतिहासकारांनी हे लिहून ठेवले आहे. त्यामुळे फुले-शाहू-आंबेडकरांना बाजूला सारण्याचे कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेवेळी कुणी अडचण केली? तरीही महाराजांनी कुणाचाही विरोध केला नाही. महाराजांनी मंदिर आणि मशीद बांधली. त्याचबरोबर शरद पवार यांनी अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केल्याचे राज्याला माहिती आहे. संभाजी भिडे सायकलीवरून पडल्यावर त्यांच्यावर शस्त्रक्रिया डॉ. मुजावर यांनी केली आहे.
Web Title: Governor Bhagat Singh Koshyari Statement On Loudspeaker Nashik Political News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..