ग्राउंड रिपोर्ट : नाशिक-जळगाव सीमेवर ‘आओ जाओ घर तुम्हारा’!

गुजरात, औरंगाबाद, शिर्डी मार्गावर आरोग्य तपासणीची बोंबाबोंब
ground report
ground reportesakal

नाशिक : ‘सकाळ’च्या बातमीदारांनी केलेल्या जिल्ह्याच्या सीमांवरील ‘ग्राउंड रिपोर्ट’मध्ये जिल्हाबंदीच्या राज्य सरकारच्या आदेशाबद्दल आनंदीआनंदी असल्याचे चित्र आढळून आले. नाशिक-जळगाव जिल्ह्याच्या सीमेवरील अमोदे फाटा (नांदगाव) येथे तपासणी नाका नसल्याने ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी अवस्था कोरोना संसर्ग फैलाव रोखण्यासंबंधी दिसून आली. हे कमी की काय म्हणून नाशिक-औरंगाबाद सीमेवर आरोग्य तपासणीची बोंबाबोंब असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. चाळीसगाव राज्यमार्ग, गुजरात सीमा, शिर्डी मार्ग अशा भागातील नेमकी स्थिती यानिमित्ताने पुढे आलीय...

ground report
ground reportesakal

कोरोना बळावण्याची भीती बळावलीय

किरण डोंगरे : सकाळ वृत्तसेवा

अमोदे फाटा (नांदगाव) : नाशिक-जळगाव सीमेवर कसल्याही प्रकारची तपासणी होत नसल्याने जळगाव जिल्ह्यातून नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही वाहतूक पिलखोड, वेहेळगाव, सायगावमार्गे होतेय. त्यामागील कारण म्हणजे, चाळीसगाव-नांदगाव व चाळीसगाव-मालेगाव येथे होणारी तपासणी. त्यामुळे मधला मार्ग म्हणून पिलखोड-अमोदे फाटा असा मार्ग प्रवासासाठी निवडण्यात आलाय. छोटे उद्योगधंदेवाले मोटारसायकल, छोट्या वाहनांद्वारे खेड्यांमध्ये मालविक्रीस येत असल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये कोरोना फैलावाची धास्ती बळावलीय. गेल्या वर्षी अमोदे फाटा येथे पोलिस-आरोग्य कर्मचाऱ्यांतर्फे तपासणी होत असल्याने चोरट्या मार्गाचा अवलंब करण्यावर निर्बंध आले होते.

तपासणीची नेमकी स्थिती पाहत असताना रस्त्याने प्रवास करणारे सचिन देशमुख भेटले. त्यांच्याशी संवाद साधताना ते म्हणाले, की मी चाळीसगाव येथील रहिवासी असून, मनमाडला जायचे असल्याने मी हा रस्ता खराब असला, तरी या मार्गाने आलो आहे. कारण येथे तपासणी होत नाही. ई-पासची झंझट नाही. सोबत इतर कागदपत्रे ठेवण्याचा प्रश्‍न उद्‌भवत नाही.

अमोदेचे विनोद पगार म्हणाले, की गेल्या वर्षी येथे तपासणी करण्यात येत होती. आता मात्र तपासणीचा मागमूस नाही. परिणामी, या भागातून वर्दळ वाढली आहे. त्यातून परिसरात कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

ground report
ground reportesakal
ground report
जिल्हाबंदीचे तीन तेरा आणि 'सकाळ'च्या दणक्यानंतर यंत्रणा अलर्ट!

कोरोनाची होत नाही चाचणी

शशिकांत पाटील : सकाळ वृत्तसेवा

न्यायडोंगरी : येथून सुमारे दोन किलोमीटरवरील चाळीसगाव राज्यमार्गावर तपासणी नाका आहे. येथून एक किलोमीटरवर जळगावची सीमा आहे. पोलिस अन्‌ गृहरक्षक दलाच्या जवानांकडून तपासणी होत असली, तरीही गुरुजनांची मदत नाही. येथे तंबू उभारण्यात आला आहे. मात्र, सीमेवर कोरोना चाचणी होत नसल्याचे प्रकर्षाने आढळले. न्यायडोंगरी व परिसरातील गावांचे आर्थिक, वैद्यकीय, शैक्षणिक, दूध व्यवसाय व शेतीसंबंधी व्यवहार चाळीसगावशी निगडित आहेत. जिल्हाबंदीची अंमलबजावणी होत असताना कोरोनाचा संसर्ग फैलावणार नाही याकडे गांभीर्याने पाहायला हवे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याच वेळी किराणा दुकानदारांकडे काम करणारे कामगार, भाजीपाला, व्यापारी यांचे ओळखपत्र अन् कोरोना चाचणीचा अहवाल ग्राहकाला दिसेल अशा दर्शनी भागात लावला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

ground report
ground reportesakal

शिवाराला जोडणाऱ्या मार्गांनी पोलिसांना चकवा

दीपक देशमुख : सकाळ वृत्तसेवा

झोडगे : मुंबई-आग्रा महामार्गावरील सीमेवर बॅरिकेडिंग लावून वाहनांची तपासणी केली जात आहे. येथे तंबूची उभारणी करण्यात आली आहे. तपासणीवेळी वाहनचालकांकडे ई-पास पाहिला जातो. काही जण मोबाईलमध्ये संग्रहित केलेली कागदपत्रे पोलिसांना दाखवितात. मात्र अनेक जण रात्री उशिरानंतर अन् पहाटे गाव शिवाराला जोडणाऱ्या मार्गाने प्रवास करत असल्याचे चित्र पाहायला मिळते. पोलिसांची तपासणी चुकविण्यासाठी हा खटाटोप चाललेला असतो. तपासणी नाक्यावर आरोग्याचे कारण पुढे करून पुढे जाण्याची गळ घालतात. हे कमी काय म्हणून राष्ट्रीय महामार्गालगतच्या हॉटेल आणि दुकानांमधून खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीत शारीरिक अंतर राखण्याचा फज्जा उडत असल्याने कोरोनाचा फैलाव नाकारता येत नाही. शिवाय तपासणी नाक्यावर कोरोना चाचणीची सोय उपलब्ध नाही. सकाळी अकरापर्यंत आणि सायंकाळी पाच ते रात्री आठपर्यंत दुचाकी व चारचाकी प्रवाशां‍ची गर्दी होत असल्याने तपासणी नाक्यावर शारीरिक अंतर पाळले जात नाही. तपासणी नाक्यावर काही बनवाबनवीची प्रकरणे पाहायला मिळाली. लग्न, दवाखान्यात उपचार, औषधे, अंत्यविधी अशी बनावट कारणे सांगून तपासणीतून सुटका मिळविण्याचा खटाटोप केला जातो. अनेकदा ओळखीचा फायदा घेऊन पुन्हा येणार नाही, असे सांगून सटकण्याचा यशस्वी प्रयत्न केला जातो. अनेकांजवळ उपचाराच्या जुन्या फायली सोबत असल्याचे दिसून आले. याखेरीज दूध, भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनांत बसून व्यावसायिक असल्याची बनवाबनवी करत दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश मिळविला जातो. तपासणी नाक्यावर आणखी धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला तो म्हणजे, वाहनचालकांच्या नाकावर सोडाच पण तोंडावर मास्क आढळत नाही. तपासणी नाक्यावर आल्यावर तेवढ्यापुरता मास्क तोंडावर चढवून पुढे निघताच, मास्क काढून टाकला जातो.

ground report
ground reportesakal

पावतीपुस्तक पोलिस ठाण्यात अन्‌ म्हणे दंडात्मक कारवाई करतोय

अजित देसाई : सकाळ वृत्तसेवा

पाथरे : सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरे गावाजवळच्या तपासणी नाक्यावर सकाळी शुकशुकाट पाहायला मिळाला. गेल्या वर्षी येथे नाशिक आणि नगर पोलिसांची दोन स्वतंत्र पथके एकमेकांसमोर तैनात होती. या महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे नगर पोलिसांनी आपला डेरा झगडे फाट्यावर नेला आहे. नाशिकच्या सीमेवर वावी पोलिस ठाण्यांतर्गत तपासणी नाका सुरू आहे. येथे दोन पोलिस खुर्च्या टाकून रस्त्याच्या कडेला असलेल्या तंबूत बसल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान दोन ते तीन प्रवासी वाहने अडथळे ओलांडत नाशिक जिल्ह्यात प्रवेशकर्ती झाली. या वाहनांची तपासणी का केली नाही, असे विचारले असता या वाहनांना अत्यावश्यक सेवेचे फलक लावलेले होते, वाहनचालक अथवा एक प्रवासी असल्याने त्यांना जाऊ देण्यात आल्याची सबब पोलिसांनी दिली. त्यानंतर शिर्डीकडून येणाऱ्या तीन ते चार प्रवासी वाहनांना थांबवत त्यांच्याकडून ई-पासची मागणी पोलिसांनी केली. मात्र हे सर्व वाहनधारक एकतर अत्यावश्यक सेवेच्या अथवा वैद्यकीय सेवेच्या नावाखाली प्रवास करत असल्याचे निष्पन्न झाले. गुजरात पासिंग असणाऱ्या एका कारचालकाने, तर माझा मुलगा नाशिकला व्हेंटिलेटरवर ॲडमिट असून, त्याला भेटण्यासाठी चाललो असल्याचे सांगितले. त्या वेळी त्याने विनापास प्रवास करत असल्याबद्दल शिर्डी पोलिसांनी फाडलेली दंडाची पावती दाखवत पुढे सोडण्याची विनंती केली. दिवसभरात २५ ते ३० प्रवासी वाहने जिल्ह्यात प्रवेशकर्ती होतात. त्यांपैकी ८० टक्के वाहनचालक वैद्यकीय कारण पुढे करतात. इतर जण परिसरातील रहिवासी असल्याने त्यांना जाऊ द्यावे लागते, असे पोलिसांचे म्हणणे होते. नाशिक येथील एक रिक्षा याचदरम्यान पोलिसांनी थांबविली. एक महिला व दोन पुरुष प्रवासी या रिक्षात होते. आम्ही जवळच्या देर्डे गावातील राहणारे असून, दशक्रिया विधी आटोपून नाशिककडे परतत असल्याचे त्यांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थितीच्या नावाखाली विनापास प्रवास करणे म्हणजे नियम मोडणे झाले. अशा वेळी संबंधित वाहनचालकांवर कुठली कारवाई करण्यात येते, असे विचारल्यावर दंडात्मक कारवाई केली जाते असे उत्तर मिळाले. मात्र दंडाच्या पावतीचे पुस्तक वावी पोलिस ठाण्यात असल्याने ही कारवाई नेमकी कशी होते हा प्रश्न कोड्यात टाकणारा होता. सहाय्यक निरीक्षक सागर कोते म्हणाले, की सद्यःस्थितीत दोन पोलिस दिवसा, तर तिघे रात्री तपासणीसाठी नियुक्त आहेत. त्यांच्या जोडीला उपलब्ध तसा गृहरक्षक दलाचा जवान दिला जातो. गटविकास अधिकाऱ्यांकडे आरोग्य कर्मचाऱ्यांबाबत मागणी केली. मात्र अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण देत त्यांच्याकडून नकार देण्यात आला. गेल्या वर्षीप्रमाणे शिक्षकांना सेवेत आणण्याची गरज आहे. तसे झाल्यास पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल. बारा तासांची ‘ड्यूटी’ तपासणीसाठी लावण्यात आली आहे. शिर्डी महामार्गावर वाहनांची वर्दळ तुलनेने अगदी कमी आहे. असे असले तरी गेल्या तीन दिवसांत पंधरा ते वीस वाहनांना ई-पास नसल्याने त्यांच्या जिल्ह्यात माघारी पाठविण्यात आले.

पर्यायी मार्गांचा हमखास वापर

पोलिसांची तपासणी चुकविण्यासाठी वाहनचालक पर्यायी रस्त्यांचा वापर करतात. वावी येथून निमोणमार्गे संगमनेरकडे जाता येते. वावी-तळेगावमार्गे लोणी, वावी व पाथरे येथून कोळपेवाडी, राहाताकडे जाण्याचे पर्यायी मार्ग आहेत. एवढेच नव्हे तर जिल्हा तपासणी नाक्‍याच्या काही अंतरावर पाथरे येथून पोहेगावमार्गे नगर जिल्ह्यात प्रवेश करता येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com