esakal | जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत ऑक्सिजन प्लँट उभारावेत; पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

बोलून बातमी शोधा

Oxygen Plant
जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत ऑक्सिजन प्लँट उभारावेत; पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढत जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था व्हावी, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी (ता.२) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना दिले.

पहिल्या टप्प्यात नऊ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन उत्पादन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून दहा कोटी ८८ लाख रुपयांना मान्यता देण्यात आली. केंद्र सरकारकडून चार ठिकाणी आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या ‘सीएसआर’मधून दोन ठिकाणी हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील उर्वरित १६ रुग्णालयांत स्वतःचा ऑक्सिजन प्रकल्प होऊन जिल्ह्यातील सर्व ३१ सरकारी रुग्णालयांतील ऑक्सिजनचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.

हेही वाचा: मुंबईहून उत्तर प्रदेशात निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला; चौघे जागीच ठार

प्रत्येक तालुक्यातील सरकारी रुग्णालयांत कायमस्वरुपी ऑक्सिजन खाटांची व्यवस्था करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नाशिकमधील जिल्हा सरकारी रुग्णालयांसोबतच मनमाड, येवला, कळवण व चांदवड या उपजिल्हा रुग्णालयांत, तर सिन्नर, पिंपळगाव बसवंत, इगतपुरी आणि वणी या ग्रामीण रुग्णालयांत ऑक्सिजन उत्पादन केले जाणार आहे. या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असून, महिनाभरात हे प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत. केंद्र सरकारकडून नांदगाव, दाभाडी, पेठ, सुरगाणा या चार ठिकाणी आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या सीएसआर फंडातून दोडी व त्र्यंबकेश्वर येथे ऑक्सिजन प्रकल्प उभारला जाणार आहे.

हेही वाचा: नाशिक शहरात ऊसनवारीच्या लसींचाही तुटवडा; मोहिमेला सलग 2 दिवस ब्रेक