Gudhi Padwa 2023 : सराफ बाजारात उलाढाल 20 टक्क्यांनी वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crowd of customers to buy gold in peacock ornaments

Gudhi Padwa 2023 : सराफ बाजारात उलाढाल 20 टक्क्यांनी वाढली

नाशिक : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सराफ बाजारात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांत उत्साह दिसून आला. सराफ दुकानांमध्ये ग्राहकांची रेलचेल दिसून आली. शेअर बाजारातील पडझड, बँकांचे ठेवीवरील घटलेले व्याजदर यामुळे सोन्याचे दर वधारलेले असले तरी सोन्यात गुंतवणूक करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून आला.

गत वर्षांपेक्षा यंदाच्या सराफ बाजारातील उलाढालीत किमान २० टक्क्यांनी वाढल्याचा अंदाज सराफ व्यावसायिकांनी वर्तविला आहे. (Gudhi Padwa 2023 Turnover in jewelry market increased by 20 percent nashik news)

हमखास परताव्याची गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. यामुळेच गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सराफ दुकानांमध्ये चोख सोने वा सोन्याच्या दागिने खरेदीकडे ग्राहकांचा कल आजच्या दिवशी दिसून आला आहे.

ग्राहकांचा चोख सोने आणि सोन्याचे वेढे खरेदी करण्याकडे कल होता. त्याचप्रमाणे, सोन्याचे क्वॉइन, सोन्याचे विविध आकारातील दागिन्यांसह डायमंडचे रत्नजडित सोन्याच्या दागिन्यांनाही ग्राहकांकडून मागणी होती. तसेच, सध्या लग्नसराई सुरू असल्याने सोन्याच्या दागिन्यांचे बस्तेही आजच्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्याप्रमाणात झाले.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

"गुढीपाडव्याचा मुहूर्त सोने खरेदीसाठी सर्वोत्तम मानला जातो. सोन्याचे दर वाढलेले असले तरी ग्राहकांचा उत्साह द्विगुणित करणारा होता. ग्राहकांकडून चोख सोने, क्वॉइन, वेढ्यांसह डायमंडच्या दागिन्यांना चांगली मागणी असल्याचे दिसून आले." - मयूर शहाणे, मयूर अलंकार.

"सोने खरेदीसाठी गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने ग्राहकांची सोने खरेदीला पसंती असते. त्यामुळे सोने खरेदीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. विशेषत: शुद्ध सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे." - गिरीश टकले, टकले बंधू, सराफ बाजार.