
Nashik News: स्वर्गसुखाचा आनंद देणारा गुलमोहर बहरला! लालबुंद फुलांनी ‘फ्लेमिंग ट्री’ आकर्षक
Nashik News : इगतपुरी - त्र्यंबकेश्वर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगा आहेत. त्यामुळे येथे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या या डोंगररांगेत वनस्पतिशास्त्र प्रेमींच्या दृष्टीने दुर्मिळ होत असलेल्या विविध औषधी तसेच, रानफुले बहरली आहेत.
या मनमोहक दृश्यामुळे इगतपुरी व कसारा घाटाचा परिसर दुर्मिळ वनौषधींच्या खजिन्याने तालुका नटला आहे. (Gulmohar joy of heaven blossomed Flaming Tree attractive with red flowers Nashik News)
सध्या सर्वत्र गुलमोहोर लालबुंद फुलांनी बहरल्यामुळे निसर्गात नव्या पालवीने नवचैतन्य निर्माण झाले आहे. तसेच या काळातील विविध रानफुले, वनस्पती व वनऔषधी झाडे झुडुपे बघण्यासाठी व सृष्टीसौंदर्य न्याहाळण्यासाठी विविध भागातून अभ्यासक व हौशी पर्यटक हजेरी लावत आहेत.
गेल्या महिन्याभरापासून शिशिर ऋतूत वृक्षवेली झाडे वेलींनी आपली जुनी पालवी टाकून दिल्याने निसर्गात पानझडीमुळे मोठी उदासीनता व मरगळ आलेली दिसून येत होती. जणू निसर्ग रूसल्याने झाडे सुकल्या अवस्थेत उभी असल्याचा भास होता.
अशा उदास अवस्थेच्या काळात निसर्गाचीच दुसऱ्या बाजूने माळरानात असलेले गुलमोहर मात्र गर्द लाल व केशरी रंगाचा शालू नेसल्यागत बहरल्याने निसर्गात एक नवचैतन्य बहरल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
उन्हाळ्यात एकीकडे इतर झाडे शेवटची घटका मोजत असताना निसर्गाच्या चमत्कारामुळे वैशाख वणव्यात स्वर्गसुखाचा आनंद देणारा गुलमोहराला अगदी आग लागल्यासारखी लाल फुले सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
याला निसर्गाची किमयाच म्हणावी लागेल. गुलमोहर हा वर्षातून केवळ एकदाच तोसुद्धा उन्हाळ्यातच फुलतो. उन्हाळ्यात इतर वृक्षांची पाने गळतीच्या मार्गावर असताना मात्र हा वृक्ष बहरतो हे विशेष.