esakal | शेतकऱ्यांच्या डोळ्यात अवकाळीने पाणी; कारसूळ, नारायणटेंभीत द्राक्षबाग भुईसपाट 
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy rains damaged vineyards Nashik Marathi News

गुरुवारी (ता. १८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेला अवकाळी पाऊस निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरला. वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह आलेला तुफान पाऊस द्राक्षबागांना भुईसपाट करून गेला.

शेतकऱ्यांच्या डोळ्यात अवकाळीने पाणी; कारसूळ, नारायणटेंभीत द्राक्षबाग भुईसपाट 

sakal_logo
By
दीपक अहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : गुरुवारी (ता. १८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेला अवकाळी पाऊस निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरला. वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह आलेला तुफान पाऊस द्राक्षबागांना भुईसपाट करून गेला. द्राक्षासह गव्हाच्या पिकाला तडाखा दिल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अवकाळीने पाणी आणले. कारसूळ, नारायणटेंभी येथे काढणीला आलेली द्राक्षे भुईसपाट झाली, तर काही ठिकाणी वादळाचा कहर एवढा प्रचंड होता की द्राक्षघड तुटून बागेत सडा पडला. 

गुरुवारी धुमाकूळ घालणाऱ्या पावसाच्या नुकसानीचे चित्र शुक्रवारी (ता. १९) स्पष्ट झाले. अवकाळीने किती नुकसान केले, या चिंतेत गुरुवारची रात्र शेतकऱ्यांनी जागून काढली. भल्या पहाटेच शेतकरी द्राक्षबागेत पोचले. द्राक्षघडावरील पाणी निथळण्याची लगबग सुरू होती. द्राक्षमण्यांना तडे, बुरशीचे आक्रमण रोखण्यासाठी शेतकऱ्यांचे हात बांधले गेले. कारण, काढणीला आलेल्या द्राक्षबागेवर औषधाची फवारणी करता येत नव्हती. गव्हाचे पीक पावसाच्या तडाख्यातून सुटले नाही. 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय

द्राक्षबागा आडव्या 
कारसूळ व नारायणटेंभी या निर्यातक्षम द्राक्षबागांच्या आगरात अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची झोप उडविणारा ठरला. द्राक्षे परिपक्व झाल्याने व्यापाऱ्यांशी सौदे सुरू होते. काही बागांची तर काढणीही सुरू झाली होती, पण अवकाळीने जोरदार तडाखा दिला. त्यात सुमारे पाच एकर द्राक्षबागा आडव्या झाल्या. कारसूळचे भास्कर पगार, नारायणटेंभीचे प्रल्हाद गवळी, साहेबराव गवळी, बाळासाहेब गवळी, तानाजी गवळी, सुधाकर गवळी यांच्या द्राक्षबागा भुईसपाट झाल्या. 

हेही वाचा - नियतीने पुन्हा तिचे बाळ 'तिच्या' झोळीत टाकले! मातेचे कोरडे पडलेले डोळे पुन्हा पाणावले

यंदा द्राक्षाचे दर्जेदार पीक बहरले होते. सौद्याबाबत दोन-तीन व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू होती. येणाऱ्या उत्पन्नात बँकेच्या कर्जाची परतफेड करणार होतो, पण अवकाळी पावसाने स्वप्नांचा चक्काचूर झाला. शासनाने पंचनामे करून तत्काळ भरपाई द्यावी. 
-भास्कर पगार, शेतकरी, कारसूळ 

निफाड तालुक्यात अवकाळी पावसाने द्राक्षपिकाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महसूल व कृषी विभागाला नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. 
-दिलीप बनकर, आमदार, निफाड  

 
 

loading image