esakal | येवला तालुक्यातही पावसाचा कहर; सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

yeola rain

येवला तालुक्यातही पावसाचा कहर; सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि नाशिक) : शहर व तालुक्यात मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने आजही सर्वत्र जोरदार हजेरी लावली. यामुळे तालुक्यातील बंधारे, नदी, नाले भरून वाहत आहेत. येवला- भारम रस्त्यावरील नागडे गावाजवळील पूल देखील पाण्याखाली गेला आहे. आज सकाळी संपलेल्या २४ तासांत ५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.


तालुक्याच्या पूर्व भागात सुरुवातीपासूनच पावसाचा जोर असल्याने अनेक ठिकाणी जमिनी उपळल्या असून पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यातच मंगळवार व बुधवारच्या पावसाने अजून भर पडल्याने मोठे क्षेत्र पाण्याखाली गेल्याची स्थिती आहे. पश्चिम पट्ट्यातही अगोदर अल्प पाऊस होता,मात्र आता पावसाने सर्वत्र हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत किंबहुना अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे सततच्या पावसामुळे नुकसान होऊ लागले आहे.

जळगाव नेऊर, देशमाने येथील गाय व गोई नदीला तुडुंब पाणी वाहत आहे. याशिवाय डोंगरगाव, सावरगाव, खिर्डीसाठे येथील लघुपाटबंधारे पाझर तलाव देखील अर्ध्याहून अधिक भरल्याचे चित्र आहे. बुधवारी सकाळी आठला संपलेल्या २४ तासांत येवला मंडळात ५१,अंदरसूलला ४२, नगरसूलला ४८, पाटोदा येथे ५१, सावरगावला ४७, जळगाव नेऊरला ४४ असा एकूण २८३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. याशिवाय आज सकाळपासूनच पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात दुपारपर्यंत सुरू होता. दुपारनंतर काहीशी उघडीप मिळाली. पावसाने खरिपासह रब्बीचाही प्रश्न सोडवला असला तरी अद्याप काही भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा असून काही भागातील शेतकरी मात्र आता पावसाने उघडीप द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

हेही वाचा: नाशिक महापालिकेने 348 गणेश मंडळांना परवानगी नाकारली


नारंदी नदीवरील पुलावरून पाणी

येवला - भारम रस्त्यावरील नागडे गावाजवळील नारंदी नदीला पूर आल्याने पुलावर पावसाचे पाणी वाहत असल्याने काही काळ अनेक गावांचा संपर्क तुटला होता. वाहनचालक पुलावरील वाहत्या पाण्यातून जीवघेणी कसरत करत असल्याचे चित्र दिसत होते. तालुक्‍यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे बंधारे भरल्याने नागडे गावातील नारंदी नदीच्या पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पुलावरील पाणी ओसरत गेल्याने वाहतूक हळूहळू सुरू झाली असली तरीदेखील या पुलावरून तीन ते चार फूट पाणी अजूनही वाहत होते. नागडे गावाजवळील नारंदी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने येणारे जाणारे वाहन चालक तसेच दुचाकीस्वार जीवघेणी कसरत करत वाहत्या पाण्यातून आपली वाहने काढत असल्याचे दिसले.

बसस्थानक रस्ता पाण्याखाली

शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. शहरातील मुख्य मार्गावरून पाऊस येताच नदी सारखे पाणी वाहताना दिसत होते.शहरातील बस स्टँड परिसरात देखील पाणी आल्याने बसस्थानक व अमरधाम कडे जाणारा रोड देखील पाण्याखाली गेला आहे.रस्त्यावर पाणी आल्याने बसस्थानकावर जाणाऱ्या प्रवाशांचे देखील हाल झाली.एकूणच आलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असला तरीदेखील रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी आल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र तालुक्यात दिसले.

हेही वाचा: नाशिक : जुळ्या चिमुकल्यांसह खाणीत आढळला बेपत्ता पित्याचा मृतदेह

loading image
go to top