नाशिक महापालिकेने 348 गणेश मंडळांना परवानगी नाकारली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Utsav

नाशिक महापालिकेने 348 गणेश मंडळांना परवानगी नाकारली

नाशिक : श्री गणरायाच्या आगमनाला काही तास शिल्लक राहिले असताना महापालिकेने मंडप धोरणाच्या निकषात न बसणाऱ्या तब्बल ३४८ सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी नाकारताना १२३ मंडळांना परवानगी दिली. ९९ प्रस्ताव प्रलंबित असून, गुरुवार (ता.९) पर्यंत परवानगी दिली जाणार आहे. मोठ्या प्रमाणात परवानगी नाकारल्याने गणेश मंडळांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


शुक्रवारी (ता. १०) शहरात सार्वजनिक ठिकाणी, घरोघरी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना होत आहे. सध्या कोरोनाचे सावट असल्याने शासनाने कडक निर्बंध लावले आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मंडप उभारण्यासाठी नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. गणेश मंडळांसाठी महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी एक महिना अगोदर ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्या संकेतस्थळावर एकूण ५७४ सार्वजनिक मंडळांनी मंडप उभारणीसाठी अर्ज सादर केले. महापालिकेने आतापर्यंत परवानगी दिली नव्हती, मात्र बुधवारपासून अर्ज छाननीला सुरवात केली. त्यामध्ये मंडप धोरणाच्या निकषात न बसणाऱ्या ३४८ मंडळांचे अर्ज नाकारण्यात आले. महापालिकेने तयार केलेल्या नियमावलीचे उल्लंघन होत असल्याने या मंडळाची परवानगी नाकारल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. एकूण ५७४ अर्जांपैकी १२३ मंडळांनी नियमाची पूर्तता केल्याने मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली. तर ९९ अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत.

पंचवटी विभागात सर्वाधिक अर्ज बाद

शहरात सर्वाधिक गणेशोत्सव पंचवटी विभागात साजरा होतो. दरवर्षी याच विभागातून सर्वाधिक अर्ज प्राप्त होतात. यावर्षी ५७४ अर्जांपैकी १८३ अर्ज पंचवटी विभागातून प्राप्त झाले होते. त्यातील ११४ अर्ज नाकारले, तर ४९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी दिली. सिडको भागात १३१ अर्जांपैकी ८३ मंडळांना परवानगी नाकारली असून, ४८ मंडळांना परवानगी दिली. पूर्व भागात ९४ अर्ज प्राप्त झाले, त्यातील ६७ मंडळाची परवानगी नाकारून सोळा मंडळांना परवानगी देण्यात आली. पश्‍चिम विभागात ८५ अर्ज प्राप्त झाले. त्यातील ४४ मंडळाची परवानगी नाकारली, तर आठ मंडळांना परवानगी देण्यात आली. सातपूर विभागात ३६ परवानगीचा अर्ज दाखल झाले होते. त्यातील सोळा गणेश मंडळांना परवानगी नाकारली, सहा मंडळांना परवानगी देण्यात आली. नाशिक रोड विभागात ४५ अर्ज दाखल झाले. त्यातील २४ गणेश मंडळांना परवानगी नाकारली असून, १६ मंडळांना परवानगी दिली गेली आहे. मागील वर्षी ३७७ सार्वजनिक गणेश मंडळांनी अर्ज सादर केले होते. त्यातील २३१ मंडळांना परवानगी नाकारली होती. १४२ मंडळांना मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अर्ज अधिक येऊनही कमी मंडळांना परवानगी देण्यात आली आहे.



कोरोना पार्श्वभूमीवर गर्दी होऊन संसर्ग वाढू नये म्हणून नियमावलीच्या निकषात बसत नसलेल्या मंडळांना परवानगी नाकारली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावा लागला. गणेश मंडळांनी सहकार्य करावे.
- प्रदीप चौधरी, उपायुक्त, कर विभाग.

टॅग्स :Nashik