SAKAL EXCLUSIVE : गर्भवती महिलांमध्ये वाढतोय उच्च रक्तदाब; विभागात नाशिकमध्ये सर्वाधिक महिला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pregnant Women News

SAKAL EXCLUSIVE : गर्भवती महिलांमध्ये वाढतोय उच्च रक्तदाब; विभागात नाशिकमध्ये सर्वाधिक महिला

नाशिक : आरोग्य विभागांतर्गत १८ वर्षांवरील गर्भवतींसाठीच्या आरोग्य सर्वेक्षणातून गंभीर बाबी समोर आल्या असून, या महिलांमध्ये लपलेल्या आजारांचे निदान झाले आहे. त्यामुळे ऐनवेळी प्रसूतीदरम्यान उद्‌भवणारा धोका टाळता येणार आहे.

शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियानामुळे १८ वर्षांवरील गर्भवतींमध्ये सर्वाधिकपणे उच्च रक्तदाब (हायपर टेन्शन) असल्याचे निदान झाले आहे.

प्रामुख्याने हे प्रमाण शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक दिसून आले आहे. दरम्यान, मालेगाव, धुळे, जळगाव शहर व नगर शहर याठिकाणी गर्भवती महिलांच्या सर्वेक्षणाचे प्रमाण अत्यल्प असल्याचेही निदर्शनास आले आहे. (High blood pressure is increasing in pregnant women Mata Surakshit Abhiyan Most women in Nashik in division timely diagnosis can prevent danger Nashik News)

शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत राज्यात ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ हे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात आले होते. सदरील अभियान हे नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून (२६ सप्टेंबर २०२२) ते २० डिसेंबर २०२२ या दरम्यान राबविण्यात आले.

या अभियानांतर्गत राज्यभरातील जिल्ह्यात व महापालिका क्षेत्रांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणासाठी आरोग्य विभागातील आरोग्य अधिकारी-कर्मचारी, आशासेविका यांच्यामार्फत गर्भवतींची नोंदणी करण्यात आली.

नोंदणी करण्यात आलेल्या गर्भवती महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येऊन, त्यात उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्ताक्षय, थायरॉईड यांसह विविध आजारांची तपासणी करण्यात आली.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

तपासणीनंतर निदानानुसार गर्भवती महिलेला तत्काळ औषधोपचार सुरू करण्यात आले. यानुसार, नाशिक विभागात सर्वाधिक उच्च रक्तदाबाचे रुग्ण नाशिक शहर-ग्रामीणमध्ये आढळून आले आहेत. त्याखालोखाल नाशिक ग्रामीणमध्येच रक्ताक्षय (टीबी), मधुमेह आणि थायरॉईडचे रुग्ण आढळून आले आहेत.

नाशिक विभागात तीन लाख ४९ हजार २८४ गर्भवती मातांची नोंदणी करण्यात येऊन त्यापैकी तीन लाख ४९ हजार २०२ गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात १३ हजार ९२३ महिलांना उच्च रक्तदाब, दहा हजार ३१३ महिलांना रक्ताक्षय, आठ हजार ३१७ महिलांना मधुमेह, तर एक हजार ७४५ महिलांना थायरॉईड असल्याचे निदान झाले आहे, तर चार हजार ७८१ महिलांना अधिकच्या उपचारांसाठी संदर्भित करण्यात आले आहे.

जिल्हा/मनपा... गरोदर माता... उच्च रक्तदाब... रक्ताक्षय (टीबी)... मधुमेह .... थायरॉईड

नाशिक ग्रामीण ... ८५३३०... ४३१७....२३९६... २२६६... ७२४

नाशिक मनपा ... ३०६७७... १०५९... ६९२... २३६... ४३५

मालेगाव मनपा... ८९८७... १३७... १०२... १३७... २०

धुळे ग्रामीण... ३०८६८... ३४०... १०३९... ५६... १४

धुळे मनपा... ६५७२... १६६... २०६... २०... ०८

नंदुरबार... २३४९६... २२०४... १७३८... १५७... १५०

जळगाव ग्रामीण... ९५८२३... ३३८३... १७९२... १५२१... २०९

जळगाव मनपा...६७७६... ३१...१३२... ०१...००

नगर ग्रामीण... ५५५३०... २२१५... २२०५... ३९१२...११६

नगर मनपा... ५१४३... ७१... ११... ११... ६९

एकूण : ३४९३०४... १३९२३... १०३१३... ८३१७... १७४५

"माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ ही राज्याची महत्त्वाकांक्षी योजना होती. त्याअंतर्गत १८ वर्षांवरील गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी तज्ज्ञांकडून करण्यात आल्याने वेळीच आजाराचे निदान होऊन पुढील उपचार होणार आहेत. त्यामुळे ऐनवेळेचा धोका टाळता येणार आहे. अशा रीतीने सातत्याने अभियान राबविले जाणार आहे."

- डॉ. कपिल आहेर, आरोग्य उपसंचालक, नाशिक विभाग