
Nashik : 'अनाथाचे नाथ' बनले कळमदरी गाव!
मालेगाव (जि. नाशिक) : घटना आहे कळमदरी (ता. नांदगाव) येथील दारिद्र्यात जगणाऱ्या धोत्रे परिवाराची. गावात धोत्रेंची घरे अवघी तीन अन् रोजंदारीचे मातीकाम (Pottery) हेच जगण्याचे एकमेव साधन. तीनपैकी एका परिवारावर संकट कोसळले. जन्मापासून परोपकाराचे ओझे मिरवणारा युवक अपघातात जबर जखमी (serious Injured) झाला. ‘अनाथ’ बालमित्राला वाचविण्यासाठी अवघा गाव ‘नाथ’ बनला. तन-मन-धनाने कळमदरीवासीयांनी ‘गरिबाचे लेकरू जगायला हवे’ असे व्यक्त होत माणुसकीचे (Humanity) अनोखे दर्शन घडविले. (Humanity of kalamdari village Nashik News)
नाव विलास, पण घरात अठराविश्व दारिद्र्य. जन्माला येताच आई देवाघरी गेली. भावकीच्या मातांच्या दुधावर वाढलेले हे पोर. परमाया जणू त्याच्या पाचवीला पुजलेली. वडिलांचे छत्र वयाच्या पाचव्या वर्षी हरपले. वयोवृद्ध आजी-आजोबांनी वंशाचा दिवा दारिद्र्यात जपला. वृद्ध जोडप्याने काबाडकष्ट करून नातवाला आठवीपर्यंत शिकविले. विलासचे लग्न लक्ष्मीबरोबर झाले. तीन मुली परिवारात आल्या. आजी-बाबा देवाघरी गेले. विलास अन् लक्ष्मी हातमजुरी करून गरिबीचे ठिगळ जोडताना कष्टाला सीमा नाही. या जोडप्याचा प्रामाणिकपणा अवघ्या गावाला ज्ञात. मित्र गोतावळ्यात विलास धोत्रे सर्वांसाठी सुदामाच! नवे कपडे घेण्यासाठी कळमदरीहून नातलगांच्या दुचाकीने नांदगावला जात असताना, अपघात झाला. चालक समाधान गायकवाड गतप्राण झाला, तर विलास जबर जखमी झाला. या वार्तेने अवघा गाव हबकला. मात्र, द्रुतगतीने मदतीला सरसावलाही.
कळमदरी (ता. नांदगाव) येथील युवकांनी गावातील विविध प्रश्नांवर प्रबोधन घडविणे व उपेक्षितांना मदतीच्या हेतूने दीडशेच्यावर सुशिक्षित बेरोजगार, व्यावसायिक व नोकरदारांनी एकत्रित येऊन युवा एकता ग्रुप स्थापन केला आहे. मृत्यूशी झुंज देत असलेल्या आपल्या गरीब अन् मनमिळाऊ मित्राला जगावायचंच, असा चंग गावाने बांधला. पोटाला व डोक्याला जबर मार लागलेल्या जखमी विलासवर पाच दिवस मालेगावला प्रयास रुग्णालयात, तर सध्या धुळे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आर्थिक मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत. नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्यांना सोशल मीडियावर आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा: शिक्षणावरही महागाईचा भार; शैक्षणिक साहित्य दरात 20 ते 30 टक्के वाढ
कळमदरी गावातील प्रत्येक घरातून मदत मिळवली. ग्रामपंचायत व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी मदतीला पुढाकार घेतला. अवघ्या काही तासांत पन्नास हजारांची मदत उभी राहिल्याने तरुणाईत उत्साह संचारला आहे. या मदतीने धोत्रे परिवार आश्वस्त झाला आहे. माणुसकीची ही अनोखी भिंत तरुणाईच्या सकारात्मक कृतिशील उपक्रमाची साक्ष बनली आहे. दातृत्वाचे हे अनोखे उदाहरण मालेगाव, नांदगाव परिघात चर्चेचा विषय बनले आहे.
हेही वाचा: लग्न सराईला आता सरतीचे वेध; पावसाळीपूर्व कामांकडे वळला बळीराजा
"विलास धोत्रे अतिशय मितभाषी आणि प्रामाणिक मुलगा आहे. त्याच्यावर कोसळलेली संकटे गावाला माहीत आहेत. संपूर्ण गाव मदतीसाठी धावून आला आहे. लढाई अजून संपलेली नाही. विलासला जगवायचे आहे." - सुनील पगार, सामाजिक कार्यकर्ता, कळमदरी (ता. नांदगाव)
"गावाने केलेली मदत जन्मभर विसरता येणार नाही. माझे कुंकू वाचविण्यासाठी सगळा गाव मदतीला उभा राहिला." - लक्ष्मी धोत्रे, जखमी विलासची पत्नी, कळमदरी
Web Title: Humanity Of Kalamdari Village In Malegaon For Dhotre Family Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..