Ice Cream Rates Hike : गारेगार आईसक्रीमला महागाईच्या झळा! दुधासह कच्च्या मालाची दरवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ice cream

Ice Cream Rates Hike : गारेगार आईसक्रीमला महागाईच्या झळा! दुधासह कच्च्या मालाची दरवाढ

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : ऋतू कोणताही असो आईसक्रीम सर्वांचा जीव, की प्राण असतो. पार्टी असो किंवा छोटासा घरगुती कार्यक्रम, आईसक्रीम नसेल तर त्यात रंगत येत नाही. उन्हाळ्यात तर आईसक्रीम जणू अनेकांसाठी अमृतच.

पण वाढत्या महागाईची झळ आता कुल्फी आणि आईसक्रीमलाही बसली असून दरात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. असे असले तरी वाढते ऊनपाहता विक्रीत २० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

तीन ते चार महिन्यात पिंपळगाव बसवंत शहरात अंदाजे एक कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. खवय्यांची आईस्क्रीम पार्लरवर गर्दी वाढू लागली आहे. (Ice Cream inflation Rates Hike Increase in price of raw materials including milk nashik news)

सध्या अनेक नवीन फ्लेवर्स बाजारात आले आहेत, पण केसर पिस्ता आणि बटर स्कॉच आणि सोबतीला कुल्फी सदाबहार आहेत. त्यापाठोपाठ ब्लॅक फॉरेस्ट, चॉकलेट, स्ट्रॉबेरी, व्हॅनिला, राजभोग, रजवाडी या फ्लेवर्सलाही पसंती असते. हिवाळ्यात आईसक्रीम मागणी मंदावल्याने व्यवसाय कमी होत असला तरी मार्च ते जून आणि जुलै ते सप्टेंबर या काळात आईसक्रीमची प्रचंड विक्री होते.

दूध आणि इतर गोष्टी महागल्याने आईसक्रीमच्या किमतीत वाढ झाल्याने दरवाढ झाली आहे. लहान फॅमिली पॅक ज्याची किंमत १८० रुपये होती ती आता २०० रुपयांवर पोहोचली आहे. बाजारात प्रत्येक फ्लेवरच्या आईसक्रीम मोठी श्रेणी उपलब्ध आहे. ती सर्वच वयोगटातील ग्राहकांना आकर्षित करते.

आईसक्रीम पार्लर संचालकांनी सांगितले की, शहरात अरुण, अमूल, क्वालिटी, वाडीलाल, मदर डेअरी, दिनशॉ, ट्रीट, हॉक्समेक, बिस्कीन रॉबिन, टॉप अॅन टॉऊन, बस्कीरिबन्ससह या ब्रँड्ससह स्थानिक आईसक्रीमही बाजारात उपलब्ध आहेत.

कप, कोन, स्टिक्स आणि फॅमिली पॅकमध्ये तसेच वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये ते उपलब्ध आहे. १५० ते २०० प्रकरचे आईसक्रीम फ्लेवर बाजारात आहेत. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरातील सर्व ब्रँड्सनी त्याचे छोटे पॅक देखील काढले आहेत.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

जे आकर्षक आणि वाजवी किमतीत सर्वांना उपलब्ध होतात. एका कप आईस्क्रीम २० किंवा २५ रुपयांपासून सुरू होते. त्याचप्रमाणे अँगल, स्टीक आणि फॅमिली पॅकही लहान व मोठ्या आकारात उपलब्ध आहेत.

कोरोनाच्या ब्रेकनंतर बुस्ट

दोन वर्षांपासून कोरोनाच्या टाळेबंदीनंतर आता शीतपेयांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसू लागली आहे. मागील दोन वर्ष दुकाने बंद होती. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव संपला असून सर्व निर्बंध शिथील झाले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांनीही मोकळा श्वास घेतला आहे. बंद पडलेल्या शीतपेयांच्या चाकांना गती मिळत आहे.

"बिअरबार रात्री बारापर्यंत सुरू असतात. आईसक्रीमची दुकाने मात्र, अकरापर्यंत बंद करावी लागतात. रात्री उशिरापर्यंत खवय्ये आईसक्रीम खाण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांची अडचण होते. दुकानांची वेळ वाढवून द्यावी." -संजय वाघ, आईसक्रीम विक्रेते

टॅग्स :NashikIce Creamrates hike