
Unique Tradition : वडांगळीकरांची जावयासाठीची जगावेगळी प्रथा! जाणुन घ्या नक्की भानगड काय?
विकास गिते : सकाळ वृत्तसेवा
सिन्नर (जि. नाशिक) : भारत हा विविध प्रथा परंपरा ,चालीरीती जपणारा देश आहे. विविधता हा भारतीयांमध्ये असलेला गुण आहे. अशीच जगावेगळी प्रथा सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे गेल्या शतकाहून अधिक वर्षे चालत आलेली आहे.
काही दोन तीन वर्षांचा अपवाद सोडल्यास आजतागायत जावयाची गाढवा वरून धिंड काढण्याची प्रथा ग्रामस्थांनी अखंडितपणे जपली आहे. (unique tradition of Wadangali to procession of son in law on donkey nashik news)

साधारणपणे गाढवावरून धिंड काढणे म्हणजे लौकिकार्थाने त्या व्यक्तीचा काही दुष्कृत्यामुळे निषेध करणे असा होतो, त्याची धिंड काढून जाहीरपणे त्याची बदनामी केली जाते. परंतु वडांगळीकरांची रीतच न्यारी! गावात एखादा जावई शोधून त्याला गाढवावर बसवून गावातून त्याची मिरवणूक (धिंड) काढली जाते.
तीपण ढोलताशांच्या गजरात व तरुणाई गुलालाची तसेच विविध रंगांची उधळण करीत, डीजे च्या तालावर बेधुंद नाचत आपला आनंदोत्सव साजरा करत असते. जावयाची वेशभूषा पण आगळी वेगळीच( दुष्ट लागावी अशी) वडांगळी मधील शनी चौक म्हणजे अनेक सुखदुःखाच्या घटनेची साक्ष देणारा! शनीचे दर्शन घेऊन जावयाला गाढवावर बसविले जाते.
त्याचा साज शृंगार करताना प्रथम डोक्याला एक फाटकेतुटके बाशिंग बांधून कांद्याच्या मुंडावळ्या, गळ्यात फाटक्या चपलांचा हार, कांदा, लसूण, बटाट्याची माळ घातली जाते. काही ऊत्साही तरुण तोंडाला काळे फासतात.
तर काही वेगवेगळा रंग लावून जावयाच्या तोंडाचा नकाशाच बदलतात, बिचारा जावई किती कडक शिस्तीचा व ताठर स्वभावाचा असला तरी दुसऱ्याच्या ताब्यात असल्याकारणाने वाघाची बिल्ली व्हावे लागते, गाढवावर बसण्यापूर्वी त्याचे समुपदेशन केले जाते.अनेक बुजुर्ग लोक या परंपरा प्रथेचे वर्णन करतात.
ज्याची धिंड काढली जाते त्याचे भविष्यात भले होते, हे सांगण्यासही ही मंडळी विसरत नाही. या शंभर एक वर्षात स्वातंत्र्यपूर्व काळात ही एका इंग्रजाची गाढवावरून ग्रामस्थांनी बळजबरीने बसवून धिंड काढल्याची आठवण जाणकार सांगतात. त्यावेळी तो इंग्रज अधिकारी खूप चिडला व अशा भंपक प्रथा बंद करण्याचा फतवा त्याने काढला.
परंतु ग्रामस्थांनी त्याला कडाडून विरोध केला. "गाव करील, ते राव काय करील " या म्हणीचा प्रत्यय यावेळी आला. त्यानंतर ही प्रथा आजपर्यंत अविरतपणे सुरू आहे. जावई झालेल्यांमध्ये डॉक्टर, शिक्षक, नोकरदार व्यापारी शेतकरी या सर्वांची वर्णी लागली आहे. जावयाची गावातून सवाद्य मिरवणुकीनंतर ती सबंधित यजमान ( सासरे) यांच्या दारात स्थिरावते.
अंगणात जावयाचे औक्षण, स्नान वगैरे करण्यासाठी महिला वर्ग तयारीतच असतो. अंगणात पाट मांडून त्यावर जावयाला गाढवावरून उतरवून पाटावर बसवले जाते. अंगाला सुवासिक उटणे, साबण लावून गरम पाण्याने स्नान घातले जाते. त्यानंतर घरात नेऊन पाटावर नेऊन बसवले जाते. पाटासमोर सुंदर रांगोळी काढून सुगंधी उदबत्ती लावून मंगलमय वातावरण करण्यात येते.
जावयाला नवीन पोशाख, टॉवेल, टोपी घालून, सुवासिनी कडून कपाळावर गंध अक्षता लाऊन औक्षण केले जाते. बाहेर लाऊडस्पिकरवर महिला लग्नाची गाणी म्हणून, उखाणे घेतात असा हा अनुपम सोहळा उपस्थितांना याची देही याची डोळा बघण्यास मिळतो व सर्व या धिंडीचा मनमुराद आनंद उपभोगतात.
ही मिरवणूक (धिंड)पाहण्यासाठी तालुका तसेच पंचक्रोशीतील आबालवृद्ध हजेरी लावतात. काही प्रथा परंपरा जपण्यात वेगळा आनंद असतो याची प्रचिती ग्रामस्थांना येते त्यासाठी सर्वजण कामाला लागतात.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
अशी असते संपूर्ण प्रक्रिया
होळी ते रंगपंचमी या दरम्यान जावई संशोधनाचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. अगोदर वडांगळी आणि पंचक्रोशीत गाढवाचा शोध घ्यावा लागतो नंतर जावई शोध सुरू होतो.
गावात कोण जावई येतो याची खबर तरुणाई घेत असते, नाही जावई मिळाला तर गावात नवीन स्थिरावलेला नोकरदार, कर्मचारी व्यावसायिक याची चाचपणी करून अंतिम निर्णय ग्रामस्थ घेतात. ही प्रथा जिल्ह्यात नाहीतर महाराष्ट्र व बाहेर पण माहीत झालेली आहे.
त्यामुळे सहसा चुकूनही जावई अथवा कोणी अनाहुत पाहुणा वडांगळीकडे फिरकत नाही. होळी आणि धुलीवंदन असे दोन दिवस गेले. आता तीन चार दिवसच बाकी आहे. या काळात जावई होण्याचा मान कोणाला मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या प्रथेची दूरदर्शन, वृत्तवाहिन्या तसेच वृत्तपत्रे व समाज माध्यमांनी दखल घेतली आहे.