esakal | निफाड तालुक्यात ४० टक्के पेरण्या; शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

sowing

निफाड तालुक्यात ४० टक्के पेरण्या; शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

sakal_logo
By
दीपक अहिरे


पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पावसाने ओढ दिल्याने पेरणीचा नांगर रूतला होता. दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केल्याने निफाड तालुक्यात शेतकरी पेरणीला सरसावले आहेत. पावसाने हजेरी लावल्याने पेरणी ४० टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. मका, सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक असून, आतापर्यंत १५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. टोमॅटो लागवडीला मल्चिंग पेपरचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. (In Niphad taluka 40 percent sowing has been completed)


निफाड तालुक्यात यंदा टोमॅटोसह सोयाबीन व मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आहे. पण, गेल्या महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी पेरणीसाठी धजावत नव्हते. दोन दिवसांपासून पावसाने निफाडच्या उत्तर - पूर्व भागात कमबॅक केले आहे. तर गोदाकाठ, ओझर, पिंपळगाव बसवंत, पालखेड, कसबे सुकेणे या भागात पावसाचा जोर अद्याप वाढलेला नाही. मात्र, कोणत्याही क्षणी पाऊस धुव्वाधार बरसणार असे चित्र आहे. पाऊस येईल या अपेक्षेने अगोदर पेरणीचा धोका पत्करलेल्या शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आहे. कोमेजलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.


खरिप हंगामात ३९ हजार हेक्टरवर निफाड तालुक्यात पेरणी होईल, असे कृषी विभागाने क्षेत्र ठरविले. पावसाच्या आगमनाने पेरणीचा टक्का वाढला आहे. यात मका ६ हजार ९०० हेक्टर, तर सोयाबीनची ७ हजार २०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. बाजरीचा पेरा ५८ हेक्टरवर पोहचला आहे. अजूनही सर्वसाधारण क्षेत्राचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ६० टक्के म्हणजे २३ हजार हेक्टरवर तूर, मूग, भुईमूग, उडिद या पिकांची पेरणी होण्याची आवश्‍यकता आहे.

हेही वाचा: नाशिकवर पाणी कपातीचे ढग! गंगापूर धरणात ३४ टक्केच जलसाठा

टोमॅटो लागवडीला मल्चिंग पेपरचा वापर…

टोमॅटो हे तसे जुगारी पिक आहे. गेल्यावर्षी २० किलोच्या क्रेटला ५०० रूपयांपर्यंत दर मिळाल्याने यंदा निफाड तालुक्यात ८०० हेक्टरवर टोमॅटोची लागवड होण्याचा अंदाज आहे. यातील ३०० हेक्टरवर सध्या लागवड झाली आहे. टोमॅटोच्या लागवडीत शेतकऱ्यांनी नव्या वाणाबरोबरच तंत्रज्ञानाची जोड दिलेली आहे. यंदा मल्चिंग पेपरचा लागवडीसाठी वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो. अतिपाऊस, मुळ्यांचे संरक्षण, रोगाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर वाढला आहे. आगाप लागवड केलेले टोमॅटो पुढील महिन्यात बाजारात दाखल होतील. दडी मारलेल्या पावसाचे काही प्रमाणात का होईना आगमन झाले आहे. पावसाच्या हजेरीने शेतकरी सुखावला आहे. सुकू लागलेली पिके पुन्हा तरारली आहेत. आंतरमशागतीच्या कामात शेतकरी गुंतले आहेत.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात आज १३४ कोरोना बाधित, चौघांचा मृत्‍यू


पावसाचे प्रमाण वाढताच खरिप हंगामातील पिक पेरणीला वेग येईल. अगोदर पेरणी झालेल्या सोयाबीनवर किडीचा प्रार्दुभाव संभवतो. जमिनीत लोहाची कमतरता असलेल्या भागात सोयाबीनच्या शिरा हिरव्या व पाने पिवळी पडू शकतात.
- बी. जी. पाटील, तालुका कृषी अधिकारी, निफाड

(In Niphad taluka 40 percent sowing has been completed)

loading image