सिंहस्थ आराखड्यात दारणातून थेट पाइपलाइनचा समावेश; पाणी पुरवठ्यासह जलशुद्धीकरण केंद्राचा समावेश | Inclusion of direct pipeline through Daran in Simhastha scheme Including water treatment plant with water supply nashik NMC | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC Nashik News

NMC News: सिंहस्थ आराखड्यात दारणातून थेट पाइपलाइनचा समावेश; पाणी पुरवठ्यासह जलशुद्धीकरण केंद्राचा समावेश

NMC News : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने आराखडा तयार करताना त्यात दारणा धरणातून थेट पाइपलाइन योजना प्रस्तावित केली आहे.

एकूण एक हजार कोटी रुपयांच्या सिंहस्थ पाणी पुरवठा आराखड्यात पंपिंग स्टेशन जलशुद्धीकरण केंद्र उभारणीचा समावेश आहे. (Inclusion of direct pipeline through Daran in Simhastha scheme Including water treatment plant with water supply nashik NMC)

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने महापालिकेच्या जवळपास ४३ विभागांकडून प्रारूप आराखडा मागविण्यात आला असून आराखड्याच्या पडताळणीचे काम सुरु आहे.

ऑक्टोबरमध्ये शासनाला अंतिम प्रारूप आराखडा सादर केला जाईल. सिंहस्थात पाणी पुरवठ्याचा विषय महत्त्वाचा असतो. त्या अनुषंगाने पाणी पुरवठा विभागाने जवळपास एक हजार कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार केला आहे.

यात प्रामुख्याने नाशिकरोडच्या पाणी पुरवठ्याचा विचार करण्यात आला आहे. नाशिकरोड भागाला दारणा धरणातून पाणी पुरवठा होतो. त्यासाठी मागील दोन वर्षांपर्यंत तीनशे दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले जात होते.

परंतु दारणाच्या चेहेडी पंपिंग स्टेशन येथून पाणी उपसताना अळी व दुर्गंधी युक्त पाणी उपसा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या त्यामुळे येथून पाणी उपसा बंद करून नाशिकरोड भागासाठी गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होवू लागला.

त्यामुळे नाशिकरोडसाठी दारणा धरणातील आरक्षण कमी करून दोनशे दशलक्ष घनफुटापर्यंत आणले गेले. त्याऐवजी गंगापूर धरणात आरक्षण वाढविण्यात आले. नाशिकरोड भागाचा विस्तार मोठा आहे.

दारणा धरणातील आरक्षित पाणी देखील वाया जात असल्याच्या पार्श्वभूमीवर दारणा धरणातून थेट पाइपलाइन योजना टाकण्यासाठी सिंहस्थ आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.

आराखड्यात दारणा धरणावर २५० दशलक्ष क्षमतेच्या पंपिंग स्टेशनची उभारणी, पंपिंग स्टेशन ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत थेट जलवाहिनीची टाकली जाणार आहे.

गंगापूर व मुकणे धरण येथून कच्चे पाणी उचलून जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. त्यामुळे पंपिंग क्षमता वाढविली जाणार आहे. बारा बंगला व पंचवटी जलशुद्धीकरण केंद्रांवर पंपिंग मशिनरी बसविली जाणार आहे.

वितरण व्यवस्था बळकटीकरण

सिंहस्थात मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने त्यांची तहान भागविण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. त्यात शहराची लोकसंख्या २५ लाखांपर्यंत पोचल्याचे वॉटर ऑडिट मधून स्पष्ट झाले आहे.

या सर्व बाबींचा विचार रून अस्तित्वातील पाणीपुरवठा वितरण यंत्रणेची क्षमतावाढ, नवीन पाइपलाइन, जलशुद्धीकरण केंद्रांची निर्मिती करावी लागणार आहे. त्या दृष्टीने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने प्रारूप आराखडा तयार केला.

नाशिकरोड सह विल्होळी जलशुद्धीकरण केंद्र येथे १३७ दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, विल्होळी साठवण टाकीपासून गांधीनगर, नाशिकरोड व पंचवटीतील साधुग्राम पर्यंत १हजार ८०० मिलिमीटर व्यासाची ५० किलोमीटर लांबीची मुख्य जलवाहिनी टाकणे, साधुग्राम मध्ये २० दशलक्ष लिटर क्षमतेचे २० मीटर उंचीचे जलकुंभ उभारणे, साधुग्राम व भाविक मार्गावर ६०० ते १५० मिलिमीटर व्यासाची १८ किलो मीटर लांबीची मुख्य गुरूत्व वाहिनी टाकणे, मुख्य व शाखा वितरण वाहिनी टाकणे या कामांचा समावेश आराखड्यात करण्यात आला आहे.

सिंहस्थ पाणीपुरवठा आराखड्यावर अपेक्षित खर्च

- जलशुद्धीकरण व जलवाहिनी टाकणे : ६८० कोटी रुपये.

- भाविक मार्ग व साधुग्राम मध्ये जलवाहिन्या टाकणे : २४० कोटी रुपये.

- साधुग्राम, वाहन तळ, भाविक मार्गावरील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. : २५ कोटी रुपये.

- गंगापूर व मुकणे धरणासाठी प्रत्येकी एक नवीन पंपिंग मशिनरी बसविणे : २० कोटी रुपये.

- साधुग्राममध्ये वीस मीटर उंचीचा व वीस दशलक्ष लिटर्स क्षमतेचा जलकुंभ : ५ कोटी रुपये.