
नाशिक : महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या जीएसटी, घरपट्टी, पाणीपट्टी व नगररचना विभागाकडून बांधकाम शुल्काच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नावर मर्यादा आल्या असून, तब्बल पाचशे कोटी रुपयांनी उत्पन्न घटल्याचा अंदाज लेखा विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याबरोबरच आर्थिक गाडा हाकण्याची कसरत करावी लागणार आहे.
महापालिकेच्या उत्पन्नात तब्बल पाचशे कोटींची तूट
केंद्र शासनाकडून जीएसटी अनुदानातही कपात होण्याचे संकेत मिळत आहेत, मुद्रांक शुल्कातही कपात होणार असल्याने शासन अनुदानात होणारी मोठी कपात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांना जमिनीवर आणणारी ठरण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी प्रशासनाने सुमारे अठराशे कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यात साधारण अकराशे कोटी रुपये उत्पन्नाची बाजू ग्राह्य धरण्यात आली होती. परंतु चालू आर्थिक वर्षाच्या सहा महिन्यांत महापालिकेच्या उत्पन्नात तब्बल पाचशे कोटींची तूट निर्माण झाली. यासंदर्भात नवनियुक्त आयुक्त कैलास जाधव यांना लेखा विभागाने अहवाल सादर केला असून, त्यात उत्पन्न तुटीची बाजू मांडण्यात आली आहे.
जीएसटी अनुदानावर प्रश्नचिन्ह
सहा महिन्यांत घरपट्टीमधून साधारण ४० कोटी रुपये महसूल प्राप्त होणे अपेक्षित होते. परंतु बारा कोटींची तूट निर्माण झाली. जीएसटी अनुदान मासिक ८४ कोटी रुपये प्राप्त होते. शासनाकडे जीएसटी अनुदानात घट झाल्याने महापालिकेला किती प्रमाणात अनुदान प्राप्त होईल, याचा अंदाज नाही. पन्नास टक्के कट बसला तरी चाळीस कोटींपर्यंत अनुदान प्राप्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घरपट्टी वसुलीसाठी महापालिकेने सवलत योजना जाहीर केली. परंतु नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
कर्ज रोखे उभारण्याची शक्यता
बेजार होत असलेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेता महापालिकेकडून कर्जरोखे उभारले जाण्याची शक्यता आहे. शासनाने जीएसटी अनुदान देणे बंद केल्यास महापालिका कर्जरोख्यांचा प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. महापालिकेचे उत्पन्न घटत असले तरी नगरसेवकांसाठी मंजूर करण्यात आलेला पन्नास कोटींचा नगरसेवक निधीतून प्रभागातील किरकोळ कामे केली जाणार आहेत. यात रस्ते, पथदीप, ड्रेनेजच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या होत्या. नवीन आयुक्त कैलास जाधव काय निर्णय घेतात, याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.
संपादन - किशोरी वाघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.