esakal | पहिल्या तिमाहीत नाशिक महापालिकेच्या उत्पन्नात १५० कोटींची घट
sakal

बोलून बातमी शोधा

nashik municipal corporation

पहिल्या तिमाहीत नाशिक महापालिकेच्या उत्पन्नात १५० कोटींची घट

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून नगरसेवकांकडून कामाचा रेटा लावला जात असताना दुसरीकडे पालिकेच्या उत्पन्नात पहिल्या तिमाहीमध्ये दीडशे कोटी रुपयांची घट आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. नगरसेवक निधीबरोबरच विविध विभागांसाठी तरतूद केलेल्या एकूण निधीला २५ टक्के कात्री लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (income of Nashik Municipal Corporation decreased by one and a half crore in first quarter)

तिमाहीचा आर्थिक आढावा घेत असताना आर्थिक वर्षाअखेर साधारण तीनशे कोटी रुपयांची महसुलात घट निर्माण होईल, असा दावा केला जात आहे. पुढील वर्षी नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांकडून विकासकामांचे प्रस्ताव सादर केले जात आहे, मात्र भांडवली कामांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त कैलास जाधव यांनी मंगळवारी (ता.६) विविध विभागांचा जमा व खर्चाचा तिमाही आर्थिक आढावा घेतला. शासनाकडून प्राप्त होणारे जीएसटी अनुदान, मालमत्ता कर, नगर नियोजन, पाणीपट्टी व मिळकत व्यवस्थापन आदी विभागांकडून जमा व खर्चाची बाजू समजून घेण्यात आली. अंदाजपत्रकात गृहीत धरलेल्या एकूण रकमेपैकी आत्तापर्यंत १८. १९ टक्के रक्कम जमा झाल्याचे निदर्शनास आले. तिमाही अंदाजपत्रके जमिनीच्या तुलनेत प्रत्‍यक्षात दीडशे कोटी रुपयांनी महसुलात घट झाली. त्यानुसार वार्षिक ३०० कोटी रुपये तूट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यामुळे आगामी काळात महसूल वाढीबरोबरच अत्यावश्यक कामे वगळता भांडवली कामे हाती घेताना कामाची निकड उपलब्ध निधीचा विचार करूनच कामे हाती घेण्याच्या सूचना आयुक्त जाधव यांनी दिल्या.

हेही वाचा: मालेगाव उपविभागात ४३ टक्के पेरण्या; पावसाअभावी कामे रखडली

महसूल वाढीचे आव्हान, संघर्ष वाढणार

महापालिकेला शासनाकडून जीएसटीचे अनुदान प्राप्त होते, मात्र कोरोनामुळे अनुदान प्राप्त होण्यात अडचण निर्माण होत आहे. शासनाकडून नियमित अनुदान प्राप्त होईल, हे गृहीत धरून घर व पाणीपट्टी, नगररचना विभागाकडून प्राप्त होणाऱ्या विकास शुल्काकडे अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. आर्थिक वर्षाच्या तिमाहीचा विचार करता अपेक्षित उत्पन्न प्राप्त न झाल्याने भांडवली कामांवर मोठा परिणाम होणार आहे. पंचवार्षिकमधले शेवटचे वर्ष असल्याने नगरसेवकांची विकासकामे मार्गी लावण्यासाठी दबाव आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात कामावरून प्रशासनाविरुद्ध लोकप्रतिनिधी असा संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

(income of Nashik Municipal Corporation decreased by one and a half crore in first quarter)

हेही वाचा: परमवीर सिंगच्या अडचणीत वाढ; नाशिक पोलीसाकडून गंभीर आरोप

loading image