दसरा, दिवाळीनिमित्त घरांच्या मागणीत वाढ! मुंबईकरांची शहरांबाहेर वास्तव्याला अधिक पसंती

home flat.jpg
home flat.jpg

नाशिक : राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात केलेली कपात, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत प्राप्त होणारे अनुदान व कोरोनामुळे अर्थचक्राला गती मिळावी म्हणून बॅंकांच्या व्याजदरकपातीचा सकारात्मक परिणाम गृहनिर्माण क्षेत्रावर दिसून येत आहे. दसरा, दिवाळीच्या निमित्ताने घरांना वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी व्यावसायिक सरसावले आहेत. 

दसरा, दिवाळीनिमित्त घरांच्या मागणीत वाढ​
मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्याने सर्वच व्यवसाय बंद पडून अर्थचक्र मंदावले होते. जूनपर्यंत पाच टप्प्यांत लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली. नाशिकमध्ये ऑटोमोबॉइल, इलेक्ट्रिकल-इलेक्ट्रॉनिक्स, कृषीनंतर सर्वाधिक उलाढाल होत असलेल्या बांधकाम व्यवसायाचे काय होईल, असा प्रश्‍न पडला होता. परंतु दसरा, दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर परिस्थिती अगदी उलट झाल्याचे दिसून येत आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत घरांना अधिक मागणी वाढल्याने बांधकाम क्षेत्रावरचे संशयाचे मळभ दूर झाले आहे. दसरा व दिवाळीसाठी शहरात सुरू असलेल्या पाचशेहून अधिक बांधकामांच्या साइट्सवर घरांना मागणी वाढल्याने हा ट्रेंड कोरोनाच्या परिस्थितीतही कायम राहणार आहे. 

मुंबई, ठाणेकरांची पसंती 
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, दक्षिण मुंबईमध्ये कोरोनाने कहर केल्याने या गर्दीच्या शहरांबाहेर वास्तव्याला अधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे अगदी दोन ते अडीच तासांत या शहरांमध्ये पोचण्यासाठी नाशिक सोईस्कर असल्याने येथील नागरिकांनी नाशिकमध्ये वास्तव्य करण्यास पसंती दिली आहे. त्याव्यतिरिक्त राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात तीन टक्क्यांनी कपात केल्यानंतर ‘टू बीएच के’चा फ्लॅट खरेदी करताना सव्वा लाखांची बचत होते. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २.६७ लाखांचा फायदा पदरात पडत असल्याने एक घर खरेदीमागे साधारण चार लाखांची बचत होते. गृहकर्जाच्या व्याजदरात मोठी कपात झाल्याने ग्राहकांचा घरखरेदीकडे कल वाढला आहे. 

...ही आहेत प्रमुख कारणे 
- मुद्रांक शुल्कात शासनाने केलेली तीन टक्के कपात 
- गृहकर्जाचे दर ६.९५ टक्क्‍यांपर्यंत घसरले 
- कोरोनामुळे स्वतंत्र वास्तव्याची वाढलेली मानसिकता 
- मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून वाढली मागणी 
- नाशिकमधून मुंबई-ठाण्यात ये-जा करणे सोपे 
- पंतप्रधान आवास योजनेचा लाभ 
- पाण्याची मुबलकता, स्वच्छ हवामान 
- कोरोनानंतरच्या काळातही घरांच्या दरात न झालेली वाढ 

लॉकडाउन काळात बांधकाम क्षेत्रावर गंडांतर येईल असे वाटत होते. परंतु परिस्थिती अगदी उलट झाली असून, मागणी अधिक वाढली आहे. व्याजदरातील कपात, मुद्रांक शुल्कात झालेली घट व मुंबई भागातील नागरिकांकडून नाशिकमध्ये गृहखरेदीला मिळत असलेली पसंती गृहव्यवसायाला बूस्टर डोस देणारी ठरत आहे. -रवी महाजन, अध्यक्ष, क्रेडाई 

राज्य सरकारने न भूतो न भविष्यती अशी मुद्रांक शुल्कात कपात केलीच. बांधकाम व्यावसायिकांच्या नरेडको संस्थेनेही त्यांच्या प्रकल्पात गृहखरेदी केल्यास उर्वरित तीन टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. मुद्रांक शुल्क शून्यावर आल्याने त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. -सुनील गवादे, सदस्य, नरेडको  

संपादन - ज्योती देवरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com