esakal | अफगाणिस्तानातील परिस्थितीमुळे नाशिकच्या बेदाण्याला झळाळी
sakal

बोलून बातमी शोधा

increase-demand-of-Nashik-raisins-due-to-situation-in-Afghanistan

अफगाणिस्तानातील परिस्थितीमुळे नाशिकच्या बेदाण्याला झळाळी

sakal_logo
By
एस. डी. आहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : अफगाणिस्तान (Afghanistan) तालिबान्यांच्या (Taliban) मगरमिठीत गेल्याने जगाच्या पातळीवरील देवाणघेवाणीचे समीकरण बदलले आहे. याचा लाभ नाशिकच्या बेदाणा उद्योगाला झाला आहे. गेल्या आठवड्यात पिंपळगाव बाजार समितीत बेदाण्यात दहा ते पंधरा रुपये प्रतिकिलोमागे वाढ नोंदली गेली. त्यामुळे बेदाणा उद्योगात चांगले वातावरण आहे. अजूनही नाशिक जिल्ह्यात साडेतीन हजार टन बेदाणा शिल्लक आहे.

बेदाणा निर्मितीतील मोठा स्पर्धक बाद होणार

अफगाणिस्तानातील काळ्या व हिरव्या बेदाण्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असते. उच्च प्रतीच्या उत्पादनामुळे अफगाणिस्तानच्या बेदाण्याला जगभरात मागणी असते. मात्र तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा करताच परिस्थिती बिघडली आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तानमार्गे दळणवळणाची सर्व साधने बंद झाली आहेत. अनेक ठिकाणचे चेक पोस्ट उद्‍ध्वस्त करण्यात आल्याने भारतासह बाहेरच्या देशात अफगाणिस्तानमधून निर्यात होणारा बेदाणा पूर्णपणे बंद झाला आहे. नाशिकच्या बेदाण्याला टक्कर देणाऱ्या अफगाणिस्तानच्या हिरव्या पाचूची स्पर्धा नसेल. त्यामुळे निर्यातीतील मोठा स्पर्धक बाद झाला आहे.

यंदा नाशिकमध्ये ३० हजार टन पिवळ्या बेदाण्याची निर्मिती झाली. त्यातील सुमारे आठ हजार टन परदेशात, तर देशांतर्गत अठरा हजार टनाची विक्री झाली. अफगाणिस्तानने अद्याप जगातील बहुतांश देशाशी आयात-निर्यातीबाबत धोरण स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे सौदी, दुबई, रशिया, मलेशिया, श्रीलंका, युरोप, जर्मनी, स्पेन, पोलंड, इंग्लंड, ब्राझील या देशात नाशिकचा बेदाणा भाव खाण्याची चिन्हे आहेत. आधुनिक यंत्रसामग्रीमुळे प्रतवारी करून निर्यातक्षम बेदाणा बनविण्याकडे उत्पादकांचा कल असतो. त्यामुळे नाशिकचा बेदाणा रंग, वजन व गोडीला सरस ठरत असल्याचे व्यापारी सांगतात.

हेही वाचा: नाशिक : विधानसभा सदस्य असल्याचे भासवणारा तोतया लोकसेवक गजाआड

सण-उत्सवांमुळे बेदाणा तेजीत

देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात असल्याने अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल झाले आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा-दिवाळी हे सण तोंडावर आहे. त्यामुळे देशांतर्गत नाशिकच्या बेदाण्याला मागणी वाढू शकते. गेल्या आठवड्यात पिंपळगाव बाजार समितीत ३०० टन बेदाण्याची आवक झाली. महिन्यापूर्वी प्रतिकिलो सरासरी ८० रुपये दर बेदाण्याला होता. अफगाणिस्तानातील चिखळलेली परिस्थिती व सण-उत्सवामुळे बेदाण्याच्या बाजाराला चांगले दिवस आले आहेत. त्यातून आता सरासरी ९५ रुपये, तर कमाल १२५ रुपये प्रतिकिलो दराने व्यापाऱ्यांनी सौंदे केले आहेत. अजूनही जिल्ह्यातील शीतगृहात साडेतीन हजार टन बेदाणा शिल्लक आहे. तंत्रशुद्ध पद्धतीने जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, कसबे सुकेणे, मोहाडी, उगाव, दिंडोरी परिसरात पिवळ्या पाचूचे उत्पादन घेतले जाते.

''अफगाणिस्तानातील परिस्थितीचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मोठा परिणाम दिसत आहे. तसेच पुढे सणासुदीचे दिवस आहेत. देश-परदेशात मोठी मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात अजूनही तेजीची शक्यता आहे.'' - शीतलकुमार भंडारी, बेदाणा निर्यातदार, पिंपळगाव बसवंत

हेही वाचा: PHOTO : लाडक्या बाप्पाच्या मुर्तींनी सजली बाजारपेठ!

loading image
go to top