
स्मार्ट सिटीच्या कामाने नेत्र विकारांमध्ये वाढ
जुने नाशिक : शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांच्या कामांमुळे नेत्रविकारांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय अपघाताच्या घटनाही घडत आहे. नियोजन पूर्वकामे करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्मार्टसिटी अंतर्गत शहराच्या अनेक भागांत स्मार्ट रस्त्याचे काम सुरू आहे. उच्च दाबाच्या वीजतारा भूमिगत करण्यापासून ते नवीन ड्रेनेज पाइपलाइन भूमिगत करून स्मार्ट रस्ता तयार केला जात आहे. रस्ता खोदून पाइपलाइन टाकल्यानंतर रस्त्याचे काँक्रिटीकरण होणे आवश्यक आहे. मात्र, तसे केले जात नाही. मातीने खड्डे बुजविले जात आहेत. ग्रामीण भागातील कच्चा रस्त्यांचा प्रत्यय शहरातील रस्त्यांवर येत आहे. अनेक महिने ते रस्ते तसेच राहिल्याने प्रवास करीत असताना, मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे.
धुलिकण हवेत पसरून प्रदूषणात वाढ होत आहे. ते धूलिकण नागरिकांच्या डोळ्यांमध्ये जाऊन नेत्रविकारांना निमंत्रण देत आहेत. डोळ्यातून पाणी येणे, खाज सुटणे, डोळे खुपणे, डोळे लाल होणे, बारीक लिखाण वाचण्यास त्रास होणे, असे नेत्र विकार नागरिकांना जाणवत आहेत.
बऱ्याच वेळेस धूलिकण डोळ्यात गेल्याने डोळे बंद होत असतात. धूलिकणांचे प्रमाण अधिक असल्यास समोरचे वाहन न दिसता अपघात होत आहे. रस्त्यांवरील खड्डे अर्धवट बुजविल्यामुळे रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे वाहने घसरून अपघात होत आहे.
सुमारे ५० टक्के वाहनचालकांना धुळीकणाचा त्रास होऊन नेत्रविकाराच्या समस्या भेडसावत आहे. एखादा खोदलेला रसत्यात पाइपलाइन, वीजतारा टाकून पूर्ण करून त्वरित रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे. त्यानंतरच पुढील रस्त्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
वडाळा रोड, त्रंबक सिग्नल ते खडकाळी सिग्नल या रस्त्यांवर धूलिकणांची अधिक समस्या जाणवत आहे. अनेक दिवसांपासून या रस्त्यावरील खोदकाम होऊन पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तरीही रस्त्याचे काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण करण्यात आलेले नाही.