सप्तश्रृंगी गडावर भाविकांकडून आकारण्यात येणाऱ्या करात वाढ | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saptashrungi temple

सप्तश्रृंगी गडावर भाविकांकडून आकारण्यात येणाऱ्या करात वाढ

वणी (जि. नाशिक) : उत्तर महाराष्ट्राची कुलदैवता व साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री सप्तश्रृंगीच्या दर्शनासाठी सप्तश्रृंगी गडावर खाजगी वाहनांनी येणाऱ्या भाविकांना आकारण्यात येणाऱ्या दरडोई करात वाढ करण्यात आली असून याबाबतचा आदेश (ता. २२) रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी पारीत केला आहे.

गडावर सुमारे 30 ते 35 वर्षांपूर्वी पहिल्या पायरीवर बांबूची काठी लावून यात्रेकरू कर घेतला जायचा. त्यानंतर गडावर येणाऱ्या भाविकांची गर्दी वर्षानूवर्ष वाढत गेल्याने भाविकांना नागरी सुविधा पुरवितांना ग्रामपंचायतीस आर्थिक मर्यादा येत असल्याने उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून प्रदीर्घ कालावधीनंतर शासनाच्या ग्रामपंचायत अधिनियमांच्या अधीन राहून सप्तशृंगगड ग्रामपंचायतीने सप्तश्रृंगी गडावर येणाऱ्या भाविकावर दरडोई २ रुपये भाविकांकडून देवीदर्शन कर घेण्याचा निर्णय जिल्हा परिषद स्थायी समितीच्या ४ ऑगस्ट २०१६ च्या सभेत पारीत करुन त्याबाबातचा आदेश १४ मार्च २०१७ रोजी जारी करण्यात आला होता. त्यानूसार सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीने विहित अटी शर्तीनूसार २९ मार्च २०१७ पासून खाजगी वाहनांद्वारे गडावर येणाऱ्या भाविकांकडून दोन रुपये आकारण्यास सुरुवात केली होती. दरम्यान सप्तशृंगी गडावरील दिवसेंदिवस वाढणारी भाविकांची गर्दी, ग्रामपंचायतीस उत्पन्नाचा स्त्रोत मर्यादीत असल्यामूळे भाविकांना पूरविण्यात येणाऱ्या सोयी- सुविधा पुरवण्यात मर्यादा येत असल्याने सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश पवार, उपसरपंच जयश्री गायकवाड व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसभेत झालेल्या ठरावानूसार पंचायत समिती व जिल्हा परीषद यांच्याकडे सुधारीत दरडोई कर रु. ५ प्रमाणे आकारणी करण्यास परवानगी मिळणेबाबतच्या प्रस्तावात सादर केला होता. त्याबाबत जिल्हा परीषदेच्या स्थायी समितीच्या १४ जानेवारी २०२२ च्या सभेत सदर प्रस्तावास मंजुरी देण्यात आली होती.

हेही वाचा: नाशिक : फडणवीसांच्या ‘त्या’ चुकीने शिवप्रेमी नाराज

त्यानूसार जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी (ता. २२) रोजी सुधारीत दरडोई रु. ५ प्रवेश कर आकारणीबाबतचा आदेश अटी व शर्तीना आधीन राहून जारी करण्यात आला आहे. यात पूर्वी प्रमाणेच सार्वजनिक वाहन (एस.टी), शासकिय वाहनातील प्रवासी तसेच अपंग व लहान मुले या करातून वगळण्यात यावे, नवरात्रोत्सव व यात्रा कालावधीत सदर कर आकारणी करण्यात येऊ नये, सदरचा कर हा खाजगी वाहनातुन येणा-या वाहनातील प्रत्येक प्रौढ यात्रेकरु यांचेकडुन दरडोई ५ रुपये दराने आकारण्यात यावा, कराच्या उत्पन्नातुन यात्रेकरुंकरीता सोयी सुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील, वेळोवेळी आकारण्यात येणाऱ्या कराची वसुली व प्राप्त होणाऱ्या उत्पन्नावर पं. स. चे नियंत्रण राहील, कर दिल्या नंतर प्रत्येक यात्रेकरुस पास देणे बंधनकारक आहे, पंचायतीने पासचा आकार, नमुना व रंग ठरवुन असे पास क्रमांकासह छापुन गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचे कडुन निश्चित व प्रमाणित करुनच वापरणेबाबत कार्यवाही करण्यात यावी आदी अटी व शर्तीचा समावेश आहे.

सप्तश्रृंगी गडावर खाजगी वाहनांनी येणाऱ्या भाविकांना आकारण्यात येणाऱ्या दरडोई करात वाढ करण्यात आली असून त्याबाबतचा पारीत आदेश.

सप्तश्रृंगी गडावर खाजगी वाहनांनी येणाऱ्या भाविकांना आकारण्यात येणाऱ्या दरडोई करात वाढ करण्यात आली असून त्याबाबतचा पारीत आदेश.

हेही वाचा: शेतकऱ्यांनो सावधान! चंदन लागवडीचे आमिष दाखवणारी टोळी सक्रिय

''वाढीव दरडोई कर आकारणीसाठी ग्रामपंचायतीच्या प्रस्तावास आमदार नितीन पवार व जि. प. सदस्या जयश्री पवार यांच्या माध्यमातून पाठपूरावा करुन मंजुरी मिळाली आहे. यामूळे ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढण्यास मदत होवून भाविकांसाठी सुलभ शौचालय, स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी, स्वच्छता, अतंर्गत रस्ते आदी विकास कामांसाठी ग्रामपंचायत प्रयत्नशिल आहे.'' - रमेश पवार, सरपंच, सप्तशृंगी गड

Web Title: Increase In Taxes Levied By Devotees On Saptashrungi Gad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top