Nashik News : शहरात अवैद्य मद्याचा महापूर ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alcohol News

Nashik News : शहरात अवैद्य मद्याचा महापूर !

नाशिक : नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून सातत्याने अवैध्य मद्य विक्री अड्ड्यांवरती कारवाई सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी एकही कारवाई होत नसताना अचानक दररोज होत असलेल्या अवैध मद्याच्या अड्ड्यांवरील कारवाईमुळे शहरात मध्यांचा महापूर आलाय की काय अशीच शंका व्यक्त होते आहे.

दरम्यान, देशी व विदेशी व गावठी मद्याचा साठा करुन त्याची विक्री करणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या या कारवायांत ७७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत. (Increase of illegal liquor in city Action is being taken daily by city police Nashik News )

जुन्या नाशिकमधील अमरधाम रोडवरील संतकबीरनगर येथे युसूफ चाँद शेख (४०, रा. संतकबीर नगर) याच्या ताब्यात (ता. २८) एकूण १७०० रुपयांचे गावठी मद्य विक्री करताना आढळून आले. त्यास भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे.

तर, औरंगाबाद रोडवरील डाळींब मार्केटसमोर (ता. २८) आकाश मनोज कोनाळीकर (२३, रा. वाल्मीक नगर, पंचवटी) हा साडेसात हजाराचे देशी व विदेशी मद्य (एमएच १५ सीजे ६३१०) अॅक्टिव्हा वाहनावर विक्रीच्या उद्देशाने बाळगताना आढळला होता. सदरची कारवाई मध्यवर्ती गुन्हेशाखेने केली. आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

अंबड येथील महालक्ष्मी नगरात असलेल्या सचिन किराणा स्टोअर्सवर अंबड पोलिसांनी छापा टाकून १७ हजारांचे देशी विदेशी मद्य व बिअर जप्त केली. या प्रकरणात सविता त्र्यंबक सोनवणे व सगुणा सचिन सोनवणे (दोन्ही रा. शिवनेरी सदन, महालक्ष्मी नगर) या दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरचे चुंचाळे येथील शिवाजी किराणा दुकानाच्या मागे सूरज सुभाष चाफळकर (वय ४०) हा १३ हजार रुपयांचे देशी व विदेशी मद्यजवळ बाळगताना आढळून आला. तसेच, याच भागात संतोष रावसाहेब तळेकर (वय ४३) याच्याकडून ५ हजार ८०० रुपयांचे देशी व विदेशी मद्य अंबड पोलिसांनी हस्तगत केले. दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

भगूर येथील राहुरी रोडवरील हॉटेल गावरान तडकाजवळ कृष्णा भास्कर पवार (वय ३०) याच्या ताब्यात ९८० रुपयांचे देशी व विदेशी मद्य आढळून आले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, वडाळागावातील कोळीवाडा, मनपा शाळेमागे रवींद्र तुकाराम गोतरणे हा देशी मद्य जवळ बाळगताना आढळला. इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

धडक कारवाई तरी धंदे सुरूच

गेल्या काही आठवड्यापासून शहर पोलिसांकडून आयुक्तालय हद्दीत सुरू असलेल्या अवैध मद्य विक्री विरोधात धडक कारवाई सुरू आहे दररोज चार-पाच कारवाया होत असतानाही अवैध व्यवसाय सुरूच आहे. काही महिन्यांपूर्वी शहरात अवैद्य मद्य व जुगार अड्ड्यांवरती कधीतरीच कारवाई होत होती. गेल्या काही दिवसापासून अचानक दररोज सुरू असलेल्या या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असले तरी पोलिसांची कारवाई मात्र थांबलेली नाही.