Latest Marathi News | धार्मिक स्थळी पर्यटकांची मांदियाळी; विक्रेत्यांनी सुगीचे दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

religious tourism

Nashik : धार्मिक स्थळी पर्यटकांची मांदियाळी; विक्रेत्यांनी सुगीचे दिवस

जुने नाशिक : दिवाळीच्या सुटीमुळे शहर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातील पर्यटकांची शहराच्या विविध धार्मिक स्थळी दर्शनासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे पूजा साहित्य व अन्य विविध प्रकारच्या विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोना प्रादुर्भाव असल्याने सर्व सण साध्या पद्धतीने साजरी करण्यात आले. (increasing tourists at religious places nashik Latest Marathi News)

लॉकडाउन आणि कोरोना प्रादुर्भाव यामुळे सुटी असूनही नागरिकांना पर्यटनाच्या आनंदापासून वंचित राहावे लागले. घरातल्या घरात सुटी घालविण्याची वेळ आली. यंदा मात्र परिस्थिती सामान्य असल्याने सर्व निर्बंध उठवण्यात आले आहे. दिवाळीदेखील उत्साहात साजरा करण्यात आली. त्यानंतर आता उर्वरित सुटी नागरिकांकडून पर्यटनाचा आनंद घेत घालविल्या जात आहे. त्यानिमित्ताने शहराच्या विविध भागातील धार्मिक आणि पर्यटन स्थळी पर्यटकांकडून हजेरी लावली जात आहे.

धार्मिक स्थळी दर्शनाचा लाभ घेत पर्यटन स्थळी फिरण्याचा मनसोक्त आनंद घेतला जात आहे. विविध प्रकारची खरेदीसह बोटिंग करण्याचा आनंदही घेत आहे. सोमेश्वर येथील सोमेश्वर मंदिरात दर्शनासाठी पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहे. त्यानंतर मंदिर परिसर नदीपात्रात बोटिंग केली जात आहे. सर्वांना भुरळ घालणाऱ्या सोमेश्वर धबधबा, बालाजी मंदिर याठिकाणी पर्यटकांकडून भेट देत छायाचित्र सेल्फी काढून आठवणी जतन केल्या जात आहे.

हेही वाचा: Nashik : माणूस घडवायला गेलेला शिक्षक 17 वर्षांनंतर परतला मूळ गावी

अशाच प्रकारची काहीशी परिस्थिती शहरातील इतर धार्मिक स्थळांवरदेखील दिसून येत आहे. यामुळे धार्मिक आणि पर्यटन स्थळ परिसरात असलेल्या पूजा साहित्य विक्रेता आणि अन्य दुकानांवर पर्यटकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षानंतर सुगीचे दिवस आल्याच्या प्रतिक्रिया विक्रेत्यांकडून देण्यात आल्या. त्याचप्रमाणे पार्किंग चालविणारे आणि पर्यटकांना फिरविण्यासाठी असणाऱ्या रिक्षाचालकांनाही अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे.

"दोन वर्षानंतर दिवाळी सुटीमध्ये सोमेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाल्याचे बघायला मिळाले. यामुळे मंदिर परिसर पुन्हा पर्यटकांनी गजबजून निघाला आहे."
- राहुल बर्वे, माजी अध्यक्ष, श्री. सोमेश्वर विश्वस्त मंडळ

हेही वाचा: Nashik: हाताच्या बोटांचे यशस्वीरीत्या पुनर्रोपण; गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया पूर्ण