
Nashik : टरबुजावरील फळ माशीचा आंबा फळावर प्रादुर्भाव
खामखेडा (जि. नाशिक) : परिसरात दहा वर्षांपासून टरबूज (Watermelon) आणि खरबूज (Melon) ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहेत. मात्र, या पिकावरील फळमाशीने (Fruit Flies) आंबा पिकाला बाधा पोहचू लागली आहे. गावरान व हायब्रीड आंब्याच्या (Mangoes) कैऱ्यांवर फळ माशी दिसू लागल्याने आंबा बाधित होण्याचे प्रमाण वाढणार आहे. (Infestation of Watermelon fruit fly on mango fruit Nashik News)
फळमाशी हंगामनिहाय फळांचे आणि फळभाज्यांचे नुकसान करते. उन्हाळ्यात साधारणत: फेब्रुवारी ते जून या हंगामात मोठ्या प्रमाणावर खामखेडा व परिसरात टरबूज आणि खरबूज पिकाची लागवड केली जाते. या पिकाच्या काढणीनंतर शिल्लक राहिलेल्या फळांची विल्हेवाट न लावल्यास या फळांवर मोठ्या प्रमाणावर फळमाशांची उत्पत्ती होते. पिक काढणी करत असतांना फुटलेली व खराब झालेले फळ फळमाशीस पोषक असल्याने या ठिकाणी माशांची उत्पत्ती अधिक होते. या माशांमुळे टरबुजासोबतच आंबा, पेरू, चिकू, अंजीर, डाळिंब, लिंबूवर्गीय फळांसोबत दोडकी, काकडी, भोपळा, कारली या वेलवर्गीय फळभाज्यांचे देखील नुकसान होत आहे. सदर माशी फळाला छिद्रे पाडून बाहेर पडते.
हेही वाचा: जांभूळमाळच्या महिलांची पायपीट कधी थांबणार?
फळांच्या सालीवर पाडलेल्या छिद्रातून फळांत सूक्ष्म रोगकारक घटकांचा शिरकाव होतो. त्यामुळे संपूर्ण फळ सडून जाते. बऱ्याचदा फळमाशीने प्रादुर्भाव झालेली फळे बाहेरून चांगली दिसतात. पण, आतून सडलेली असतात. फळे परिपक्व होण्याच्या काळात फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. हवामानानुसार आणि फळांच्या उपलब्धतेनुसार फळमाशी एप्रिल ते जुलै या काळात अधिक आढळते.
हेही वाचा: पर्यटनाला आली बहर, साहसी पर्यटनाची लहर
"मागील दोन वर्षांपासून फळमाशीमुळे आंब्याचे नुकसान होत असून, नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने पोषक घटकांचे नियंत्रण ठेवावे. तसेच, कृषी विभागाने नियंत्रणासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे." - गणेश शेवाळे, शेतकरी, खामखेडा
Web Title: Infestation Of Watermelon Fruit Fly On Mango Fruit Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..