Jalgaon: सुसाट ट्रॅक्टर चढले चालत्या कारवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident
सुसाट ट्रॅक्टर चढले चालत्या कारवर

जळगाव : सुसाट ट्रॅक्टर चढले चालत्या कारवर

जळगाव : भादली (ता. जळगाव) येथील पती- पत्नी खासगी वाहनाने मध्यप्रदेशातील शेंदवा जाण्यासाठी निघाले होते. शहरातील शिवाजीनगर कानळदा रोडवर ट्रॅक्टरने कारला जोरदार धडक दिल्याने कारमधील महिला व कारचालक असे, दोघे जागीच ठार झाल्याची घटना पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. तर इतर दोन जखमी झाले असून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जळगाव तालुक्यातील भादली येथील लताबाई विजय ऊर्फ रामकृष्‍ण सपकाळे-कोळी (वय- ४५), रामकृष्ण सपकाळे (वय- ५७) असे दोघ पती- पत्नी आणि चालक संदीप सोनवणे (वय- ३७) हे कार (क्रमांक एमएच १४ एचसी, ४५५०)ने मध्य प्रदेशातील सेंधवा येथे जाण्यासाठी गुरूवारी (ता. २५) सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास निघाले होते. भादली येथून कानळदामार्गे भोकर येथे नातेवाईकांकडे जाउन तेथून सेंधव्यासाठी निघणार होते. मात्र तत्पुर्वीच जळगाव शहरातील शिवाजीनगर लाकुड पेठेतून जाणाऱ्या कानडदा रोडवर जकात नाक्याजवळच शेतातून लाकडाने भरलेल्या विनानंबरचा ट्रॅक्टर सुसाट वेगात रस्त्यावर उतरला.

हेही वाचा: आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत

कानळदाकडे जाणारी कार आणि ट्रॅक्टरची काही कळण्याआतच जोरदार धडक झाली. आडव्या बाजूने ट्रॅक्टर कारच्या बोनटवर चढले. अपघातात कारमधील लताबाई सपकाळे व चालक संदीप सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर रामकृष्ण सपकाळे आणि ट्रॅक्टरचालक बापू सपकाळे असे दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लताबाई आणि चालक संदीप अशा दोघांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. यावेळी नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती.

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत लताबाई यांच्या पश्चात पती रामकृष्ण, मुलगा अनिल, सुन, नातवंडे असा परिवार आहे. पाहटेच्या धुक्याने केला घात? थंडीचे दिवस असल्याने आणि शेतशिवारामुळे परिसरात पहाटेची ओस आणि धुके होते. अचानक लाकूड भरुन निघालेला ट्रॅक्टर रस्त्यावर आला आणि कारचालकाला काही कळण्याच्या आतच दोन्ही वाहने आदळली. अपघातात दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याने कारचा संपूर्ण चुराडाच झाला तर ट्रॅक्टरची चाकेही निखळली होती.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

अपघाताची माहिती कळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता, निरीक्षक विजय ठाकुरवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. एमएच १९ बीजी ६७०९ असा ट्रॅक्टरचा नंबर पोलिसांनी निष्पन्न केला असून वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अपघातांची हॅट्रीक

जळगाव शहरात सद्या ट्रॅक्टर, डंपर या वाहनांच्या अपघातांची मालिकाच सुरु आहे. मंगळवारी (ता. २२) शिवकॉलनी येथे वाळूचे सुसाट ट्रॅक्टर उभ्या रिक्षावर चढले. इतक्यात मुरूम वाहून नेणारे ट्रॅक्टर या दोघा वाहनांवर आदळले. या अपघाताला चोविस तास उलटत नाही तोच राष्ट्रीय महामार्गावर तरसोद फाट्यावर सुसाट डंपरचालकाने परिचारिकेस दुचाकीसह चिरडून ठार मारले. गुरुवारी पहाटे कानळदा रोडवर लाकुड वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने कारला धडक दिल्याने त्यात दोघांचा मृत्यू झाला.

जावयासाठी आटापिटा..!

लताबाई व रामकृष्ण सपकाळे यांची मुलगी भोकर येथे दिलेली आहे. जावयांच्या प्रकृतीला काही दिवसांपासून त्रास होत असल्याने त्यांच्यावर आयुर्वेदिक उपचारासाठी शेंदवार (मध्यप्रदेश) येथे घेऊन जायचा निर्णय या दाम्पत्याने घेतला होता. सकाळीच पाच वाजता तयारी करुन दोघे पती- पत्नी भादलीहून जळगाव शिवाजीनगरमार्गे भोकरकडे जाणार होते. तेथून मुलगी आणि जावयाला सोबत घेउन मध्यप्रदेशात निघणार असल्याचे नियोजन होते. मात्र, तत्पूर्वी काळाने त्यांच्यावर झडप घातली.

loading image
go to top