esakal | 'हा' तर किरकोळ वाद; गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांसमोर सोडवू!
sakal

बोलून बातमी शोधा

jayant patil

भुजबळ-कांदे किरकोळ वाद; राष्ट्रवादी पाठीशी - जयंत पाटील

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळच (chhagan bhujbal) राहतील. त्यांचा व शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (mla suhas kande) यांचा वाद जिल्ह्यातील स्थानिक विषयाचा आहे. ते एकत्र बसून नक्की सोडवतील. गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांसमोर या वादावर मार्ग निघेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शुक्रवारी (ता. १) येथे केले. भाजप-मनसेसोबत युती करण्यासाठी लाजत असल्याची बोचरी टीकादेखील त्यांनी या वेळी केली.

कांदे-भुजबळ वाद किरकोळ; गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांसमोर सोडवू
राष्ट्रवादीच्या ‘परिवार संवाद यात्रे’निमित्त येवला येथे आले असताना पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते म्हणाले, की भुजबळ हे जिल्ह्याचे पालकमंत्री असून, आम्हाला हस्तक्षेपाची गरज वाटत नाही. त्यांना नेहमीच पक्षाचा पाठिंबा राहिला आहे, आजही आहे. हा महाआघाडीतील अंतर्गत विषय असल्याने चर्चा करून न सुटल्यास मुख्यमंत्र्यांसमोर मार्ग काढला जाईल. या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉनच्या फोनची चर्चा झाली; पण भुजबळांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. ते अशा मार्गाला जाणार नाहीत. हा विषय गंभीर आणि अडचणीचा अजिबात नसून, दोघे बसून यातून मार्ग काढतील, असा विश्‍वासही पाटील यांनी व्यक्त केला. जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Nashik : तिसऱ्या लाटेसाठी दोन लाख ॲन्टिजेन किट खरेदी
स्वबळ नव्हे, एकत्रितला प्राधान्य
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील भूमिकेविषयी विचारले असता, महाविकास आघाडीतील घटकांसोबत एकत्र लढण्याला आमचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जे बरोबर येतील त्यांना सोबत घेतले जाईल, स्थानिक पातळीवरचे राजकारण पाहून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचे प्रश्‍न, संघटनेचे काम पाहण्यासाठीच मी हा दौरा सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजप लाजतोय....
भाजप- मनसे युतीवर बोलताना, भाजप मोकळेपणाने राज ठाकरेंसोबत युती करताना दिसत नाही. भाजपची इच्छा आहे; पण थोडीशी लाजते आहे, असे स्पष्ट करत त्यांना मनसेच्या मतदानाची काळजी असल्याचा टोमणाही पाटील यांनी मारला.

हेही वाचा: Nashik : शासकीय कार्यालयांमध्ये डेंगी उत्पत्ती साधनेपरमबीरसिंगावर विश्‍वास का ठेवावा?
भुजबळांना तुरुंगात डांबण्याचे काम भाजप सरकारने केले. परंतु, कोर्टाने त्यांना आरोपातून मुक्त केले. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे भाजपची यंत्रणा लागली आहे. देशमुखांवर आरोप करणारे परमबीरसिंग देश सोडून पळून गेल्याने त्यांच्या आरोपावर ईडी व इतर यंत्रणांनी का विश्‍वास ठेवावा, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला.

पंचनाम्याद्वारे सविस्तर माहिती
राज्यात पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. या नुकसानीला सरसकट मदत देण्यात तांत्रिक अडचणी आहेत. कोणत्या शेतकऱ्याने कोणते पीक, किती क्षेत्रात घेतले, त्याचे नुकसान कसे झाले, याचा तपशील मिळवूनच मदत देता येणार आहे. ही सरसकट नव्हे, तर व्यक्तिगत स्वरूपाची मदत असल्याने नुकसानीची सविस्तर माहिती पंचनामे करून जमा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top