जिद्द : सेंट्रिंग कामगाराच्या मुलीचा जगभरात डंका

Sandhya Keshe
Sandhya Kesheesakal

दारिद्र्य पाचवीलाच पूजलेलं... दोन वेळ खायची भ्रांत असलेल्या घरात जन्माला आली... जगण्याला दिशा देण्यासाठी तिनेही स्वप्न बघितलं, मात्र सेंट्रिंग कामावर जाणाऱ्या कुटुंबात हे शक्यही नव्हतं... अंग झाकण्यासाठी पुरेसं कापडंही नव्हतं...

आयुष्यात अनेक संकट येत गेली, मात्र तिनं न खचता स्वबळावर संकटांवर मात करत ‘ओ शेठ’ या गाण्याच्या निमित्ताने आपलं नाव जगाच्या इतिहासात कोरलं, त्या भाटगावच्या कन्या (सध्याचे वास्तव्य नाशिक) संध्याताई केशे यांनी..। (Jidd Centering workers daughter sandhya keshe earna fame worldwide nashik success story Latest marathi news)'

संध्याताईंचे वडील ज्ञानेश्वर सखाराम केशे चांदवड तालुक्यातील भाटगावचे... सध्याचे वास्तव्य नाशिकच्या जेल रोड, दसक येथे... आई आरती यांच्यासह चार बहिणी आणि एक भाऊ असे मोठे कुटुंब चालवत असताना ज्ञानेश्वर केशे यांना गाव सोडावे लागले.

नाशिकमध्ये येण्यापूर्वी ओझर येथील एचएएल कारखान्यात आठ वर्षे केशे यांनी कूक म्हणून हंगामी नोकरी केली. मात्र पुरेसा परतावा मिळत नसल्याने त्यांनी नाशिकचा रस्ता धरला. नाशिकच्या दसक भागात पत्र्याच्या शेडमध्ये या कुटुंबाने आपली सुरवात केली.

संध्याताईंची आईही धुणीभांडी करत होती. स्थलांतरित आयुष्य वाट्याला आलेल्या संध्याताई यांचे प्राथमिक शिक्षण महापालिकेच्या शाळेत झाले. मात्र दारिद्रयानं कुटुंबाची पाठ सोडली नाही. अंगावर गणवेश नसल्याने अनेकदा संध्याताईंना शाळेत छडी खावी लागली.

संध्याताईंना र. ज. चौहान शाळेत आठवीत प्रवेश घ्यावा लागला. या ठिकाणी शालेय शुल्क भरण्याची ऐपत नसल्याने शिक्षकांनी मदत केली. शिक्षणाचे शुल्क वर्गात गल्ला फिरवून भरले जात होते. दोन वेळचे अन्न पोटात ढकलताना चव हा विषयच या कुटुंबात नव्हता.

मात्र मुलांनी शिकून मोठे व्हावे, ही संध्याताईंच्या आई- वडिलांची इच्छा होती. नववीत असताना संध्याताई नापास झाल्या. याच काळात त्या गायनाकडे ओढल्या गेल्या. संध्याताईंना कवितेचा छंद असल्याने शालेय जीवनापासूनच त्यांनी सुमारे दीड हजारांवर कविताही केल्या.

कुटुंबाची आर्थिक ओढाताण थांबत नसल्याने केशे कुटुंब पुन्हा भाटगावला परतले. या ठिकाणी मजुरीची कामे करत सर्वच जण कुटुंबाला हातभार लावत होते. गावात वास्तव्यास असतानाच संध्याताई यांनी गावातच दहावीसाठी प्रवेश घेतला आणि दहावीचे शिक्षण भाटगावच्या हायस्कूलमध्ये पूर्ण केले.

या काळात संध्याताई गायनाकडे लक्ष देत असतानाच आर्केस्ट्रा, दिंडीत गायन करत होत्या. संध्याताईंनी सार्वजनिक ठिकाणी गायन करणे वडील ज्ञानेश्वर केशे यांना अजिबात आवडत नव्हते. त्यामुळे अनेकदा त्यांना वडिलांचा मार खावा लागत असे. याच काळात वडिलांना जडलेल्या आजारामुळे कुटुंबाची जबाबदारी आईवर आली. आजारपणामुळे वडिलांचे निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. गावात कायमस्वरूपी रोजगाराची संधी नसल्याने पुन्हा कुटुंब दसकला परतले.

Sandhya Keshe
कानबाई चालनी गंगेवरी, साखर पेरत चालनी माय

संयम राखत सावरल्या...

२०१२ मध्ये संध्याताईंच्या काव्यसंग्रहानिमित्ताने त्यांना पुण्यात जाण्याचा योग आला. याच काळात संध्याताईंच्या आयुष्यात आलेल्या वैवाहिक वादळांनी खचून जाण्याचे प्रसंग आले असताना त्यांनी संयमाने परिस्थिती हाताळत स्वतःला सावरले.

याच काळात त्यांनी कवितांसोबतच गाणी लिहिण्यास सुरवात केली. बारावीनंतर परिस्थितीमुळे शिक्षण सुटलेल्या संध्याताईंना एका शॉर्ट फिल्मच्यानिमित्ताने उस्मानाबाद येथे जाण्याचा योग आला. या वेळी भाड्यासाठी पैसे नसल्याने त्या फुलांचे गजरे बनवायचे काम करून त्यातून मिळालेल्या पैशांतून आपला खर्च भागवत होत्या.

या काळात झालेली फरफट कथन करताना त्या हमसून हमसून रडल्या. गजरे तयार करून मिळालेल्या पैशांतून संध्याताईंना उस्मानाबादला जाता आले. याच काळात उस्मानाबादमध्ये डीजे प्रणिकेत म्हणून संगीत क्षेत्रात आपले करिअर करणाऱ्या प्रणिकेत खुळे यांच्याबरोबर कामाची संधी मिळाली. येथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

नेटकऱ्यांनी नेले सातासमुद्रापार...

संध्याताई आणि प्रणिकेत यांचा पहिला व्हिडिओ ‘गोष्ट तुझी माझी’ हा प्रदर्शित झाला. या व्हिडिओला लाखो लाइक मिळाले. येथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. या क्षेत्रात त्यांची ओळख उभी राहिली.

‘गोष्ट तुझी माझी’ या गाण्याला २०१८ मध्ये सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र बहाल केल्याने ही जोडी नावारूपाला आली. चौकट ‘ओ शेठ’ने पोचवले जगभर... गीतकार व संगीतकार म्हणून संध्याताई आणि प्रणिकेत यांनी ‘ओ शेठ... तुम्ही नादच केलाय थेट...’ या गाण्याने २०२१ मध्ये संध्या-प्रणिकेत जोडीला मिळालेली प्रचंड लोकप्रियता मात्र संपूर्ण जगाला वेड लावणारी ठरली.

या गाण्याला संपूर्ण जगातून साडेचार लाख सबस्क्राईबर्स आणि करोडो व्हीवर्स मिळाले. संध्याताई आणि प्रणिकेत यांच्या संगीतक्षेत्राची दखल गुगललाही घ्यावी लागली. याशिवाय ‘लई गुणाची’ या गाण्यानेही लोकप्रियतेचे शिखर गाठत संध्या-प्रणिकेत यांनी यू-ट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाखो लोकांची पसंती मिळवली आहे. याशिवाय आगामी काळात ‘गणपती’ तसेच ‘लाडूबाई’ ही दोन गाणी प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. Remarks : उत्तर महाराष्ट्र पान

Sandhya Keshe
Nashik : आगीत विवाहाची शिदोरीची राख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com