
दगडांच्या देशा : गारगोटीची श्रीमंतगिरी
लेखक - के. सी. पांडे
आपला छंद अथवा आपली आवड व त्यातच करिअर होणे, तेही जागतिक दर्जाची ओळख निर्माण करून देणारे. याहून दुसरी भाग्यवान गोष्ट नाही. आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर घडतेच असे नाही. आपण लहानपणी किंवा तारुण्यात एखादे ध्येय ठेवतो व त्यात करिअर करण्याचे निश्चित करतो, पण भविष्यात अनेक कारणांमुळे बहुतांश स्वप्न पूर्ण होत नाही. स्वप्न, छंद, आवड अपरिहार्य कारणामुळे सोडून द्यावी लागते. गारगोटी शोधार्थ परदेश व देशभर प्रवास करताना त्याच्या प्राचार व प्रसारामध्ये माझ्या गाड्यांचा फार मोठा वाटा राहिला. या गाड्यांमुळे चालत्या-फिरत्या गारगोटीबद्दल कुतूहल निर्माण होऊ लागले. काहींनी त्याला आपले करिअर म्हणून स्वीकारले. तुमची श्रीमंती का? पण मी मात्र नम्रपणे त्यांना सांगतो, की ही माझी नव्हे, तर गारगोटीची श्रीमंतगिरी आहे.
हेही वाचा: दिग्गजांचं वास्तव्य आणि सृष्टिसौंदर्य !
गारगोटीमुळे मी जगभरात प्रसिद्ध झालो होतो. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन हा तर माझ्या यशाच्या शिरपेचात तुराच रोवला गेला. सर्वदूर माझ्या छंद आणि त्यातून निर्माण झालेल्या व्यवसायाची चर्चा; पण एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवत होती, की गारगोटी हा विषय तसा समजायला अवघड. मुळात याबद्दल खूप कमी माहिती उपलब्ध होती, तर अनेकांना अशी काही वस्तू असते हेच माहीतच नव्हते. त्यामुळेच ब्रॅन्डिंग होणे गरजेचे होतं. आजकाल आपण बघतो, की कुठल्याही वस्तूच्या ब्रॅन्डिंगला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या क्षेत्रातील घटकांना गारगोटी मिनिरलबद्दल माहिती होती. माझी अशी इच्छा होती, की प्रत्येकाच्या ओठावर ‘गारगोटी’ हे नाव पाहिजे. त्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न आजपर्यंत सुरू आहेत. त्या वेळी प्रसारमाध्यमांची कमतरता होती, डिजिटल जवळपास नव्हतेच. आपल्याला आपल्या प्रॉडक्टची जाहिरात करायची असेल, तर ती एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीकडून करून घ्यावी लागते, की जेणेकरून त्याच्या वलयाचा आपले उत्पादन विकताना फायदा होईल. त्यासही काही मर्यादा होत्या. टीव्हीवर अशा जाहिराती काही क्षणापुरत्या झळकतात. मला लहानपणापासूनच जहाजे, विमाने तसेच अलिशान कार याबद्दल कमालीचे आकर्षण होते. गारगोटीसाठी कुणाला जर ब्रॅन्ड ॲम्बेसीडर बनवायचे असेल, तर ते शक्य होते; पण ती व्यक्ती २४ तास गारगोटीचे ब्रॅन्डिंग करू शकणार नाही, याची मला खात्री होती. माझा आलिशान गाड्या वापरण्याचा छंद होताच, त्याला प्रत्यक्ष रूप देण्यास मी सुरवात केली. स्वतःसाठी आलिशान कार घेतली. गारगोटीचा सिम्बॉल व नाव दर्शनी भागावर ठेवले. माझी कार जिथे जिथे जाईल, तिथे तिथे ‘गारगोटी’ नाव जात असे. त्यामुळे गारगोटीतून माझ्या कारमधून आपोआप दिसत गेले व गारगोटी किती श्रीमंत आहे, ही श्रीमंतगिरी जगाला दिसून आली. देश-परदेशातील अनेक अशा कार मी टप्प्याटप्प्याने घेतल्या. यात प्रामुख्याने पजेरो, मर्सडिज, ऑडी, रेंजरोवर अशा अनेक कार गारगोटीच्या सेवेमध्ये दाखल झाल्या. या सर्व गाड्यांचे क्रमांक मी व्हीआयपी सीरिजमधील घेतले. यातील बहुतेक कार कंपनीने लॉन्च केल्यानंतर भारतात महाराष्ट्रात सर्वप्रथम मी खरेदी केल्या. गारगोटीचे नाव प्रत्येक कारवर दर्शनी भागावर लावण्यात आले. माझी नव्हे, तर ही गारगोटीची श्रीमंतगिरी आहे, अशा प्रकारचा संदेश समाजामध्ये आपोआप पसरू लागला. यात माइलस्टोन ठरली, ती रोल्स रॉयस कार. ही उत्तर महाराष्ट्रातली पहिली कार मी खरेदी केली. या कारची दखल संपूर्ण प्रसारमाध्यमांनी घेतली व आजही या कारची सगळीकडे चर्चा आहे.
(लेखक सिन्नरस्थित गारगोटी संग्रहालयाचे संस्थापक आहेत.)
हेही वाचा: गाव करील ते सरकारही करील !

अक्वा मरिन बेरिलियम ॲल्युमिनियम सिलिकेट यातून निर्माण झालेली गारगोटी मिनिरल दगडाचा घरात वापर केल्यास मानसिक, भावनिक, शारीरिक, संतुलन स्थिर व सुरळीत राहते. तसेच इर्षा, असुरक्षितता याचे निर्मूलन करत मानसिक तणाव मुक्त करणारा हा अत्यंत लाभदायक दगड होय. स्थळ : तमिळनाडू.

रेड फ्लोराईट कॅल्शियम ऑफ क्लोरिनपासून बनलेला हा दगड नकरात्मक ऊर्जा, तणाव यास शोषून घेऊन ते नष्ट करण्याचे काम करतो. हा दगड वापरल्यास आत्मविश्वास, एकाग्रता, निर्णय घेण्याची क्षमता, सकारात्मक बाबींसाठी स्त्रोत सांगा व ऊर्जावर्धक दगड होय. मानसिक व शारीरिक संतुलन व समन्वय सुरळीत ठेवण्याचे काम हा दगड करतो. स्थळ : नाशिक.
Web Title: K C Pande Writes Saptarang Marathi Article On Gargoti Museum Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..