
Nashik News : विना कथड्याच्या पुलाला तातडीच्या दुरूस्तीची आस
पंचवटी (जि. नाशिक) : कपिला नदी ज्या भागात गोदावरीला येऊन मिळते, त्या कपिला संगम भागात असलेला पूल हा विना कथड्याचा असल्याने तो धोकादायक झालेला आहे. या भागात भक्त, भाविक व पर्यटकांची नेहमी वर्दळ असते.
या ठिकाणी एखादी घटना घडण्याची वाट न बघता महापालिका प्रशासनाने यावर योग्य तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (kapila river bridge has become dangerous as it is without safety barricades nashik news)
कपिला संगमाच्या भागात तपोवनातील मळे वस्तीकडून टाकळी रोडकडे जाणारा तसेच, मलजल शुद्धीकरण केंद्राकडे जाणारा, असे दोन रस्ते आहेत. या रस्त्याने वाहनांची व नागरिकांचीही नेहमी वर्दळ असते.
अशा या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या पूलाला कथडेच नसल्याने आणि हा पूल वळणावर असल्याने तो अत्यंत अडचणीचा ठरत आहे. अशा अडचणीच्या भागात कथडाच नाही, त्यामुळे तो वाहनचालकांच्या लक्षात येत नाही.
तपोवनातील मळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजूर याच भागातून नेहमी ये-जा करीत असतात. ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर, दुचाकी वाहने यांची या रस्त्याने वर्दळ असते. बाजूलाच भारत सेवाश्रम असल्याने तेथे होणाऱ्या कार्यक्रमांसाठी देशभरातील विविध भागातून भाविक येत असतात. कपिला संगमावर येणारे भाविक व पर्यटक येथून मारिच मंदिराकडे जातात.
हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...
शेजारी रामटेकडी ही मोठी लोकवस्ती असून, तेथील रहिवासी याच पूलावरून ये-जा करतात. या पूलाची खालची बाजू सुमारे पंधरा फूट खोल आहे. येथे कथडे नसल्याचे लक्षात आले नाही, तर वाहने त्यावरून खाली कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात कपिलानदीला पूर येण्याचे प्रकार नेहमी घडतात.
अनेकदा पाणी या पूलावरून वाहत असते. अशा वेळी हा धोका आणखी वाढतो. त्यामुळे येथे कथडा बसविणे गरजेचे आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधुग्रामकडे जाण्यासाठी याच मार्गाचा अवलंब केला जात असल्याने या बाबीकडे महापालिका प्रशासनाने जास्त लक्ष घालणे गरजेचे झालेले आहे.